Breaking News
स्मार्ट अभियंत्यांकडून स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर
नवी मुंबई ः टक्केवारीसाठी आधुनिक पद्धतीने गटारात गटार बांधण्याच्या तंत्रज्ञानाचा शोध पालिकेच्या शहर अभियंता विभागाने लावला असून त्याची चाचपणी सानपाडा सेक्टर 2 येथे केली जात आहे. सिडकोने प्री-कास्ट तंत्रज्ञानाद्वारे बांधलेले गटार तसेच ठेवून आतून नवीन गटार बांधण्याच्या या विभागाच्या अभिनव कौशल्याची सुरस चर्चा नवी मुंबईत होत असून अशा अभियंत्यांचा जाहीर सत्कार करा अशी टीका सुज्ञ नागरिक करत आहेत.
सानपाडा सेक्टर 2 येथे ओरियंटल कॉलेजलगत असलेले गटार नव्याने बांधण्याचे काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या शहर अभियंता विभागाने हाती घेतले आहे. कामाची आवश्यकता नसताना फक्त टक्केवारीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव पालिका कशापद्धतीने काम करते याचा हा जागता अनुभव सानपाडावासीय घेत आहेत. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या अभद्रयुतीतून जनतेच्या पैशाची कशी लूट सुरु आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
सानपाडा येथील पायाभूत सुविधा सिडकोने विकसीत केल्या असून या नोडमधील गटारे 30 वर्षांपुर्वी प्री-कास्ट तंत्रज्ञानाद्वारे बांधण्यात आली आहेत. या कामाचा दर्जा अतिशय उत्तम असल्याने लोकप्रतिनिधी अथवा पालिका अधिकाऱ्यांची कितीही इच्छा अनावर झाली तरी या नोडमध्ये गटारांची कामे वारंवार करता येत नाहीत. परंतु, देशात नावाजलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या शहर अभियंता विभागाने एक शक्कल लढवत गटारात गटार बांधण्याचे अभिनव तंत्रज्ञान विकसीत केले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करत असलेली प्री-कास्ट गटारे तशीच ठेवून आतमध्ये नवीन गटारे बांधण्यात येत आहेत. यामुळे गटारातील पाणी वाहून जाण्याची क्षमता कमी होणार असून त्याचे सोयरसुतक नसलेले लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी हा उपक्रम तडीस लावला आहे. अशापद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नवी मुंबईकरांकडून होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai