Breaking News
आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिल्लीत केले प्रभावी सादरीकरण
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेची पाणीपुरवठा देयके वितरण करण्याची व संकलित करण्याची वैशिष्टयपूर्ण कार्यप्रणाली राष्ट्रीय पातळीवर सादरीकरण करण्याची संधी नवी मुंबई महानगरपालिकेस देण्यात आली. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठा प्रणालीविषयी विस्तृत माहिती देत राष्ट्रीय कार्यशाळेत प्रभावी सादरीकरण केले. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर आणखी उंचावलेला आहे.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने ‘अमृत 2' प्रकल्पांतर्गत विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित ‘नळातून पेयजल' या राष्ट्रीय कार्यशाळेत ‘नवी मुंबईतील नाविन्यपूर्ण जलदेयके वितरण व संकलन यंत्रणा' या विषयावर सादरीकरण करण्यास नवी मुंबई महानगरपालिकेस निमंत्रित केले होते. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकारच्या अतिरिक्त सचिव तथा अमृत प्रकल्पाच्या राष्ट्रीय मिशन संचालक डी.थारा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या पाणीपुरवठा विषयक महत्वाच्या राष्ट्रीय कार्यशाळेत देशभरातील विविध शहरांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सर्व शहरांना पुरेसा पाणीपुरवठा होईल असे व्यवस्थापन करणे व त्याचे सुयोग्य नियोजन करणे याविषयी या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे काही शहरात राबविल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा विषयक उल्लेखनीय कार्यप्रणालीचे सादरीकरणही सर्वांच्या माहितीसाठी आयोजित केले होते. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची पाणीपुरवठा देयके वितरण करण्याची व संकलित करण्याची वैशिष्टयपूर्ण कार्यप्रणाली राष्ट्रीय पातळीवर सादरीकरण करण्याची संधी नवी मुंबई महानगरपालिकेस देण्यात आली. त्या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीसह पाणीपुरवठा देयकांचे वितरण व संकलन यंत्रणेविषयी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. याप्रसंगी उपस्थित देशातील विविध शहरांच्या अधिकारी प्रतिनिधींकडून या कार्यप्रणालीची प्रशंसा करण्यात आली.
नवी मुंबई महापालिकेमार्फत 247 पाणीपुरवठा योजनेची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जात असून पाणीपुरवठा व्यवस्थेवरील नियंत्रणात्मक स्काडा प्रणाली अदययावतीकरणाचे काम हाती घेतले जात आहे. त्याचप्रमाणे पाणी देयक भरणा करणे अधिक सुलभ व्हावे यादृष्टीने युपीआय व क्यूआर कोडव्दारे देयक भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. यामुळे नवी मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थापन प्रणालीची दखल राष्ट्रीय पातळीवर केंद्र सरकारमार्फत घेण्यात आली आहे ही नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
अमृत प्रकल्पांतर्गत आयोजित या पाणीपुरवठा विषयक महत्वाच्या राष्ट्रीय कार्यशाळेस नमुंमपा आयुक्तांसमवेत अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता वसंत पडघन, अभियंता स्वप्निल देसाई उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai