Breaking News
नागरी सुविधाचे भुखंड विकणाऱ्यांविरुद्ध आमदार गणेश नाईकांचा घणाघात
मुंबई ः सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईकरांच्या सोयी-सुविधांसाठी आवश्यक असणारे भूखंड पालिकेला दिले नसून याउलट निविदेद्वारे ते विकण्याचा सपाटा सिडकोने लावला आहे. त्याविरोधात लक्षवेधीद्वारे शासनाचे लक्ष वेधताना सिडको आणि सरकारमध्ये बिल्डरांचे दलाल बसले असल्याचा घणाघाती आरोप करुन खळबळ उडवून दिली आहे.
नवी मुंबई महापालिकेने विकास आराखडा बनवताना भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन सिडकोच्या अनेक भुखंडावर आरक्षणे प्रस्तावित केली होती. ही आरक्षणे हटविण्याचे आदेश सरकारने महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 154 अंतर्गत नवी मुंबई महापालिकेला दिले आहेत. ही आरक्षणे पालिकेने उठवली असून ते भुखंड बिल्डरांना विकण्याचा सपाटा सिडकोने लावला आहे. याबाबत नागरिकांच्या सेवा व सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवी मुंबई महापालिकेला सिडको-एमआयडीसीकडून भूखंड मिळावेत, अशी मागणी नाईक यांनी केली होती. सदर मागणीची पुर्तता अद्यापपर्यंत सिडको-एमआयडीसी यांनी केली नसल्याने उलट आहे तेवढ्या मोकळ्या जमिनी विकण्याचा गोरखधंदा दोन्ही प्राधिकरणांनी लावल्याने लक्षवेधीद्वारे आ. गणेश नाईक यांनी याबाबत सरकारचे लक्ष वेधले. 1992 साली नवी मुंबई महापालिकेची स्थापना होऊन 1995 मध्ये पहिली निवडणूक झाली, असे सांगत गेल्या 30 वर्षांत सिडको, एमआयडीसीकडून नवी मुंबई महापालिकेला मैदान, उद्याने, शाळा, रुग्णालये आदी नागरी सुविधांसाठी भूखंड मिळू शकलेले नाहीत ही बाब नाईक यांनी सदनात मांडली.
सोयी सुविधांसाठीच्या भुखंडासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी 1 जून 2023 रोजी बैठक घेतली. या बैठकीत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, एमआयडीसीचे अधिकारी आणि नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी एकत्र बसून प्रश्नांचा निपटारा करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. त्यानंतर तीन वेळा मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला. मात्र शासनाने 13 महिन्यांनी महापालिकेला कळविले की, सिडकोने लिलावाद्वारे भुखंड दिले त्यांना बांधकाम परवानग्या देण्याचे आदेश पालिकेला दिले. परंतु, जोपर्यंत पालिका आयुक्त, सिडको व्यवस्थापकीय संचालक एकत्र बसून नवी मुंबई शहराला लागणारे भुखंड मिळत नाहीत तोपर्यंत एमआयडीसी, सिडकोने विकलेल्या भुखंडावरील आदेश स्थगित करा अशी मागणी यावेळी नाईक यांनी केली. तसेच सिडको आणि राज्य सरकारमध्ये बिल्डरांचे दलाल बसले आहेत. या दलालांमुळे जनतेच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. राज्य सरकारचे अनेक अधिकारी भ्रष्ट आहेत तसेच सरकारमध्येही अनेकांचे हात स्वच्छ नाहीत, अशा शब्दांत भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी विधानसभेत सरकारला घरचा आहेर दिला. सिडकोकडून पालिकेला मिळालेल्या भुखंडावर पालिकेचे स्वायत्ता अधिकार तसेच ठेवण्यात येण्याची कार्यवाही होईल यावेळी मंत्री उद्य सामंत यांनी नाईकांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना सभागृहात सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai