Breaking News
नवी मुंबई पालिकेतील शहर अभियंता पदासाठी मंत्रालयात अनेकांची बोली
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेतील शहर अभियंता हे पद 31 मे रोजी रिक्त होत असून तेथे वर्णी लागावी म्हणून एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर विभागातील अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली आहे. ‘दहा खोके एकदम ओके' अशी टॅगलाईन या निवडीसाठी ठेवण्यात आल्याची चर्चा मंत्रालयात असून ते खोके कोणत्या फळांचे असावेत हे स्पष्ट नसल्याने बोली लावणाऱ्यांची अडचण झाल्याचे बोलले जात आहे.
4500 कोटींचे बजेट असलेल्या नवी मुंबई पालिकेतील शहर अभियंता संजय देसाई हे 31 मे रोजी निवृत्त होत आहेत. राज्यात श्रीमंत पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व देशात अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या पालिकेतील शहर अभियंता हे पद महत्वाचे मानले जाते. वर्षाकाठी सरासरी 1500 कोटी रुपयांच्या कामांची बिले या विभागामार्फत काढली जातात. त्यामुळे या पदावर नियुक्ती व्हावी म्हणून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. सध्या राज्यात प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवण्याची प्रथा जोरात असून नवी मुंबई पालिकेतील अनेक महत्वाच्या पदांवर सरकारी अधिकारी तंबू ठोकून आहेत. काही अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी नगरविकास विभागाने नियम बदलून त्यांची नियुक्ती केल्याने पालिकेच्या कर्मचारी वर्गात नाराजी आहे.
नवी मुंबई पालिकेच्या शहर अभियंता पदावर यापुर्वी मोहन डगावकर, सुरेंद्र पाटील यांसारख्या दिग्गज अभियंत्यांनी काम केले असून त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या संजय देसाई यांनी गेली तीन वर्ष प्रभारी म्हणून या पदाचा गाडा हाकला आहे. संजय देसाई हे 31 मे रोजी निवृत्त होत असून त्याजागी वर्णी लागावी म्हणून पालिकेतील अधिकारी व अन्य प्राधिकरणातील अधिकाऱ्यांमध्ये चुरस लागली आहे. काही अधिकाऱ्यांनी जातीचे कार्ड खेळण्यास सुरुवात केली असून त्यासाठी त्यांनी आपल्या जातीच्या भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरले आहे. एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अन्य प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा उत्साह कमालीचा असून सर्वांनीच मंत्रालयात जोरदार फिल्डिंग लावली आहे. ‘दहा खोके एकदम ओके' अशी टॅगलाईन या नियुक्तीसाठी वापरण्यात येत असल्याची कुजबुज सध्या मंत्रालयात आहे. परंतु, या खोक्यातील फळे कोणत्या जातीची असावी याचा अंदाज अजूनपर्यंत कोणालाच नसल्याने सर्वांचीच अडचण झाली आहे. त्यामुळे शहर अभियंता या पदावर पालिकेच्या अधिकाऱ्याची नियुक्ती होते की प्रतिनियुक्तीवर बाहेरुन अधिकारी येतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai