उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी?
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 19, 2024
- 919
द्वारकानाथ भोईर यांनीही बांधले बाशिंग
नवी मुंबई ः राज्यात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. ऐरोली मतदार संघात उबाठा कडून एम.के.मढवी यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी द्वारकानाथ भोईर यांनीही निवडणुकीसाठी बाशिंग बांधले आहे. तरी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना उबाठा गटाकडून राज्यात 150 जागा लढवण्याचे लक्ष ठेवले असून अनेक जागांची चाचपणी सुरु केली आहे. नवी मुंबईतील ऐरोली-बेलापुर मतदारसंघ महाविकास आघाडीतील कोणाच्या बाजुला जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऐरोली मतदारसंघातून शिवसेनेचे एम.के.मढवी ईच्छुक उमेदवार असून त्यांचे मातोश्रीसोबत असलेले संबंध पाहता त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या मतदारसंघातून उबाठाचे द्वारकानाथ भोईरही ईच्छुक असून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे. पण, या मतदारसंघात माथाडी कामगारांची मोठी वसाहत असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट यावर दावा सांगण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये हा विधानसभा मतदारसंघ शिंदे सेनेकडे जाण्याची शक्यता असून जर तसे झाले तर शिवसेनेच्या दोन्ही गटात तगडी लढत पाहायला मिळेल. बेलापुर मतदारसंघात मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी अप्रत्यक्षपणे तयारी सुरु केली असून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांची भुमिका निर्णायक ठरणार आहे. म्हात्रे यांना तिकीट न मिळाल्यास त्या बंडखोरी करतील अशी चर्चा सध्या नवी मुंबईत आहे. संदीप नाईक यांच्या तयारीवर म्हात्रे यांनी कोणतीच प्रतिक्रिया अजूनपर्यंत व्यक्त न केल्याने बेलापुरमधील गुढ वाढले आहे. त्यातच उबाठा कडून जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे हे ईच्छुक असून सोमनाथ वास्कर हेही गुडघ्याला बाशिंग बांधुन आहेत.
लोकसभा निवडणुकीतील ऐरोली-बेलापुर मतदारसंघात भाजपला मिळालेले मतदान पाहता दोन्ही जागा त्यांना जिंकण्याची शक्यता असली तरी शिंदेसेनेच्या सहकार्यावर ते अवलंबून आहे. दोन्ही मतदार संघापैकी एकतरी जागा शिंदेसेनेच्या पदरात न पडल्यास दोन्ही मतदारसंघात मैत्रीपुर्ण लढत होण्याची शक्यता असून त्याचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai