Breaking News
राज्यात फडणवीस, अजित पवार बॅकफुटवर
मुंबई ः शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना आपल्या बाजुला वळवण्याचा फडणवीस यांचा डाव कमालीचा यशस्वी झाल्याचे चित्र लोकसभेच्या निकालांवरुन स्पष्ट होत आहे. शिंदे यांनी 15 जागा लढवून 7 ठिकाणी तर भाजपने 28 जागा लढवून 9 ठिकाणी विजय संपादन केल्याने शिंदेंमुळे महाराष्ट्रात भाजपची इभ्रत वाचल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यापुढे विधानसभा निवडणुकीत महायुतीत शिंदेंचे महत्व कायम राहणार आहे.
महाविकास आघाडीचे सरकार पाडून फडणवीस यांनी राज्यात शिंदे गटाला सोबत घेऊन महायुतीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पाडून अजित पवार यांना जवळ केले. या फोडाफोडीच्या राजकारणाचा महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसेल अशी चर्चा राज्यात होती. भाजपने यावेळी ज्यापद्धतीने उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडत जागा वाटप केले होते त्यापद्धतीने जागा वाटप करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी शिंदेंसोबत केला. परंतु, शिंदे यांनी फडणवीसांना ताकास तूर न लावू देता आपल्याला पाहिजे तेवढ्या जागा पदरात पाडल्या. एवढेच नाही तर त्यांनी मिळालेल्या 15 जागांपैकी 7 जागा निवडून आणत आपले राज्यातील राजकीय वर्चस्व अधोरेखित केले.
भाजपने मोठा गाजावाजा करत राज्यात 28 जागा लढवल्या परंतु, त्यांना फक्त 9 जागांवर विजय मिळवता आल्याने फडणवीस यांची फार मोठी राजकीय अडचण झाली आहे. शिंदे, पवार यांच्यासोबत 45 खासदार जिंकण्याचे स्वप्न पाहिलेल्या महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागल्याने मोदी यांना सरकार स्थापनेसाठी लागणाऱ्या बहुमतावर झाला आहे. शिंदे यांना 3 जागांवर विजय मिळेल असे भाकित राजकीय समिक्षक वर्तवित असताना त्यांनी 7 जागांवर विजय मिळवून सर्वांनाच धक्का दिला आहे. शिंदे यांच्या वाट्यातील 4 जागांवर भाजपने घोळ घातल्याने त्या जागांवर प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचा आरोप शिंदे गटाकडून होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai