Breaking News
शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांची मागणी
नवी मुंबई ः आ. गणेश नाईक यांच्यावर बलात्कार व धमकावण्याचा गुन्हा दाखल करुन तो मागे घेणाऱ्या महिलेने ही तक्रार आपण विजय चौगुले व मंदा म्हात्रे यांच्या सांगण्यावरुन केल्याचे पत्र नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहे. याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी संबंधित महिलेची नार्कोटेस्टची मागणी करत या तक्रारी मागील खरे सुत्रधार शोधण्याची विनंती पत्रकार परिषदेद्वारे नवी मुंबई पोलीसांना केली आहे. पुन्हा एकदा दिपा चौहान प्रकरणाने डोके वर काढल्याने त्याची झळ कोणाला बसते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
काही महिन्यांपुर्वी आ. गणेश नाईक यांनी बलात्कार व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करुन त्यांच्याविरुद्ध दिपा चौहान या महिलेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर याच महिलेने नुकतेच पोलिसांकडे गणेश नाईक यांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्याबाबतचे लेखी पत्र दिले. या पत्रात नाईक यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आ. मंदा म्हात्रे व शिवसेना शिंदे गटाचे विजय चौगुले यांनीच सांगितल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी विजय चौगुले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेवून संबंधित महिलेची नार्को टेस्ट करुन या प्रकरणामागील बोलवता धनी कोण? याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. तसेच संबंधित महिलेने ज्यांच्या सांगण्यावरुन हे पत्र दिले त्यांची पार्श्वभुमी लक्षात घेता त्यांच्याकडूनच तिच्या जिवाला धोका असून आम्हाला या प्रकरणात गोवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्या महिलेला पोलीस संरक्षण देण्याची मागणीही चौगुले यांनी केली आहे.
राजकारणाचा या गोष्टींशी काहीशी संबंध नसून वैयक्तिकरित्या त्रास देण्याचा विरोधकांकडून निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मला बदनाम करण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो हा मागील इतिहास आहे. तसेच संबंधित महिलेने यापुर्वी मदत मागितल्याने आपण तिला व तिच्या मुलाला मदत केल्याची कबुलीही चौगुले यांनी दिली. सदर प्रकरणी आपण नवी मुंबई सहाय्यक पोलीस उपायुक्त यांची भेट घेवून याप्रकरणाचा छडा लावण्याची विनंती करणार असून वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचेही चौगुले यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai