नवी मुंबईकरांना धतुरा ठाणेकरांना मलिदा

ठाण्यातील 15 कोटींचा कोव्हिड रुग्णालयाचा खर्च सिडकोच्या माथी 

नवी मुंबई : ठाणे महापालिका पोखरण रोड येथे 1000 खाटांचे तात्पुरते कोव्हिड हॉस्पिटल उभारण्याचा खर्च एकनाथ शिंदे मंत्री असलेल्या नगरविकास विभागाने सिडकोच्या माथी मारला आहे. सिडकोने नगरविकास विभागाच्या दबावामुळे 15 कोटी 10 लाखांचा पहिला हफ्ता ठाणे महापालिकेला दिला आहे. सिडको प्रदर्शन केंद्रांत कोव्हिड रुग्णालय उभारले म्हणून नवी मुंबई महापालिकेकडे 2 कोटी भाडे मागणार्‍या सिडकोने नवी मुंबईकरांची  अवस्था धन्याला धतुरा आणि पाहुण्याचा मलिदा अशी केली आहे. 

सध्या कोरोना संक्रमणाची दुसरी लाट राज्यात आली असून दिवसागणिक हजारो रुग्ण संक्रमित होत आहेत. ठाणे महानगरपालिकेने पोखरण रोड येथील व्होल्टास कंपनीच्या आवारात 1000 खाटांचे डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर उभारण्याचे काम हाती घेतले असून त्याचा खर्च मात्र सिडकोने करावा असा लकडा नगरविकास विभागाने सिडकोकडे लावला होता. 4 हजार कोटींचे बजेट असणार्‍या महापालिकेने स्वखर्चाने हे रुग्णालय न उभारता ते सिडकोच्या माध्यमातून उभारण्याला आता नवी मुंबईतून विरोध होऊ लागला आहे. ऐन कोरोना संक्रमणाच्या काळात सिडकोने नवी मुंबईकरांसाठी खर्चाचा हात आखडता घेतला असताना बाहेर मात्र कोट्यावधी रुपये उधळत असल्याचा आरोप नवी मुंबईकरांकडून होत आहे. मुलुंड येथेही सिडकोमार्फत सोळाशे खाटांचे तात्पुरते कोव्हिड हॉस्पिटल उभारुन सरकारने सिडकोचे सुमारे 19 कोटी रुपये खर्च केले. 60 हजार कोटींच्या ठेवी असणार्‍या मुंबई महापालिकेने हे रुग्णालय स्वखर्चाने का उभारले नाही? हा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे. नवी मुंबईकर नागरिकांनी सिडको व राज्य शासना विरोधात आवाज उठवल्यानंतर सिडकोने कळंबोली येथे सुमारे 5 कोटी आणि द्रोणागिरी येथे सुमारे 75 लाख रुपये खर्च करून दोन कोव्हिड रुग्णालये उभारून दिली. परंतु ती चालवण्याचा खर्च मात्र स्थानिक प्रशासनाला उचलावा लागत आहे. 

सिडकोचे प्रदर्शन केंद्र कोव्हिड रुग्णालयासाठी वापरले म्हणून सिडकोने 2 कोटींची भाड्यापोटी मागणी नवी मुंबई पालिकेकडे केली होती. सिडकोला वर्षाला मिळणारे हजारो कोटींचे उत्पन्न हे नवी मुंबईतून मिळत असल्याने सिडकोने नवी मुंबईकरांच्या स्वास्थावर खर्च करणे अपेक्षित असताना केवळ नगरविकास विभागाच्या सांगण्यावरुन कोट्यावधींची उधळण नवी मुंबई बाहेर करणे म्हणजे धन्याला धतुरा आणि पाहुण्याला मलिदा अशी सिडकोची वर्तवणुक असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. गत दोन वर्षांपासून बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे सिडकोची आर्थिक स्थिती खालावली असून करोना प्रादुर्भावाचा मोठा फटका बसला आहे. हाती घेतलेल्या मोठ्या प्रकल्पांचा मोठा आर्थिक भार सिडकोवर पडणार असून त्याचा विचार राजकर्त्यांनी करण्याची मागणी होत आहे.