Breaking News
रेल्वे भुयारी मार्गात झरे, अस्वच्छता; सिडको प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने प्रवासी हवालदिल
नवी मुंबई ः ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गातील स्थानके अवाढव्य असली तरी त्यांना वर्षभर गळती लागलेली असते. त्यातील घणसोली रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गैरसोयी असून अस्वच्छता, तुटलेल्या टाईल्स, भुयारी मार्गात नेहमीच असलेली गळती, अशा अनेक समस्यांचा विळखा पडला आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटनांनी वारंवार संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याने घणसोलीकरांनी संताप व्यक्त केला आहे.
पावसाळ्यात रेल्वे स्थानकांची गळती छते, भिंतीतून वाहणारे झरे आणि यामुळे सबवे मध्ये साठणारे पाणी यातून वाट काढत करावा लागणारा रेल्वेचा प्रवास हा घणसोली, तुर्भे, कोपरखैरणे येथील प्रवाशांना नित्याचाच झाला आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील ही स्थानके दिसायला अवाढव्य असली तरी ती वर्षभर गळतच असतात. घणेसोली रेल्वे स्थानकात तर फलाटावरुन खाली उतरण्यासाठी असलेल्या जिन्यावर नेहमीच पाणी असल्याने अनेकदा प्रवाशी घसरुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये वृद्ध, गरोदर स्त्रियांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सध्यातर पावसाळा सुरु असल्याने गळणाऱ्या भिंतीना झऱ्याचे स्वरुप आले आहे. सतत यातून पाणी पडत असल्याने सबवेमध्ये पाणी साचून राहते. पावसाचा जोर जेवढा जास्त तेवढे पाणी जास्त साचते. अशा साठलेल्या पाण्यातून ऐन कामाच्यावेळी वाट काढणे जिकरीचे होते. या ओलाव्यातून फलाट गाठताना प्रवाशांची दमछाक होते. पाय घसरुन अनेक प्रवाशी पडतात. मात्र याकडे लक्ष देण्यास कोणत्याही प्राधिकरणांना वेळ नसल्याची खंत प्रवाशी व्यक्त करत आहेत. तसेच फलाटावरही गळक्या छतातून पाणी पडत असल्याने नागरिकांना भिजायला होते.
घणसोलीतील तिकीट घराबाहेर पाणी साठल्याने मिनी स्विमिंग पुलाचे स्वरुप येते. त्या साठलेल्या घाणीच्या पाण्यातून जावे लागत असल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. तसेच या स्थानकातील भुयारी मार्गातील कचरापेट्या गायब झाल्या असून भिंती पिचकाऱ्यांनी लाल झाल्या होऊन अस्वच्छता पसरली आहे. महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय नाही. भटक्या श्वानांचा वावर वाढला असून गेल्या आठवड्यात एका महिलेला त्याने चावा घेतल्याने दुखापत झाली. अशा गैरसोयीने ग्रासलेल्या रेल्वे स्थानकांला कोणी वाली आहे का असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस