Breaking News
लाभार्थ्यांची शासनदरबारी मागणी
नवी मुंबई ः दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने खारकोपर आणि बामण डोंगरी येथील विक्रीस काढलेल्या घरांचे दर हे बाजारभावापेक्षा जास्त आहेत. 7849 लाभार्थ्यानी आर्थिक दुर्बल घटकांसाठी सिडकोने ठेवलेले दर परवडणारे नसल्याचे सांगत घरांचे दर कमी करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरु केला आहे. त्यामुळे शासन लाभार्थ्यांच्या मागणीला कसा प्रतिसाद देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिडकोने दिवाळीच्या मुहुर्तावर 7849 घरांची सोडत काढली होती. त्यास भरघोस प्रतिसाद मिळाला. परंतु, या घरांचे दर हे आर्थिक दुर्बल घटकांच्या आवाक्याबाहेर असल्याचे वृत्त ‘आजची नवी मुंबई'ने नोव्हेंबर 2022 मध्ये प्रसिद्ध केले होते. सदर घरांची सोडत 17 फेब्रुवारीला काढण्यात आली होती. या सोडतीत यशस्वी ठरलेल्या लाभार्थ्यांना इरादा पत्रके सिडकोकडून देण्यात आली असून त्यांच्याकडून पडताळणीसाठी कागदपत्रे मागविली आहेत.
सदर इरादापत्र हातात पडल्यानंतर लाभार्थ्यांनी सिडकोकडे घरांचे दर कमी करण्याची मागणी केली होती. ऑगस्ट 2022 पर्यंत सिडकोने काढलेल्या सोडतीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांच्या घरांच्या किंमती या 18 ते 21 लाखांच्या घरात असताना ऑक्टोबर 2022 मध्ये सोडतीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीत सदर घरांच्या किमंती सरासरी 15 लाख रुपयांनी वाढविण्यात आल्या आहेत. याबदल्यात त्यांना 44 चौ. फु. अतिरिक्त चटईक्षेत्र देण्यात येणार आहे. सदर घरे ही आर्थिक दुर्बल घटकांच्या आवाक्याबाहेर असल्याने संबंधित लाभार्थ्यांनी घरांच्या किमंती कमी करण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा सुरु केला आहे. सिडकोने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने संबंधितांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे. सध्या सुरु असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर यातून आपण तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी दिल्याचे लाभार्थ्यांच्यावतीने ‘आजची नवी मुंबई' च्या प्रतिनिधीला सांगण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai