बसमध्ये जंतूनाशक फवारणी

नवी मुंबई ः जगभरात कोरोना विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने भारतातही काळजी घेतली जात आहे. नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्याचे प्रयत्न सर्व स्तरावर केले जात आहेत. नवी मुंबई परिवहन उपक्रमातही प्रवाशांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने सर्व बसेसची दैनंदिन स्वच्छता व बसेसमध्ये जंतूनाशक फवारणी करूनच बसेस परावर्तीत करण्यात येत आहेत. आगारात येणार्‍या सर्व बसेसमध्ये आगाराच्या प्रवशेद्वारावच निरजंतूकीकरणाची फवारणी करण्यात येत आहे. वातानुकूलित बसेसची दिवसातून तीन वेळा फवारणी केली जाते.  प्रवाशांसाठी उभारण्यात आलेले सर्व बस शेल्टर यांची दररोज निर्जंतुक करण्यात येत आहेत. आगारे व बस टर्मिनस व आजूबाजूच्या परिसराची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात येत आहेत. सध्या 14 मार्च 2020 पासून सर्व बसेसचे प्रवर्तन व फेर्‍या यामध्ये 30% इतकी कपात केली असून आवश्यकतेनुसार यामध्ये वाढ किंवा घट करण्यात येईल. दैनंदिन प्रवाशांमध्ये सध्या मोठया प्रमाणात घट झालेली आहे. तसेच बसेसमध्ये उभे राहून प्रवास करण्यास मनाई करण्यात आलेली असून ज्या मार्गावर यामुळे गर्दी होण्याची शक्यता दिसल्यास त्या मार्गावरील बसेसमध्ये वाढ करण्यात येईल. प्रवाशी सेवा देत असताना जनतेच्या थेट संपर्कात येणार्‍या सर्व वाहक, वाहतुक नियंत्रक, सहा. वाहतुक निरीक्षक इ. पर्यवेक्षकीय कर्मचार्‍यांना, स्वच्छता कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांना मास्क वितरित करण्यात आले आहेत.