Breaking News
मुंबई ः देशात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मनसेने आपला सशर्त पाठिंबा भाजपाला जाहीर केला आहे. त्याआधी राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली होती. पाडवा मेळाव्यात ठाकरे यांनी भाजपाला जाहीर केलेल्या पाठिंब्यामुळे मुंबईतील उत्तरभारतीय मतदारांना भाजप विरोधात उकसवण्यास विरोधकांनी सुरुवात केल्याने हा पाठिंबा भाजपाला अडचणींचा ठरू लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे भाजपची अवस्था धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
लाव रे तो व्हिडिओ म्हणून मागिल निवडणुकीत मोदींविरुद्ध प्रचार करुन स्वतःची स्वतंत्र ओळख जनमानसात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निर्माण केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्याने ते थंड झाल्याचे बोलले जात होते. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात बसवला. पण भाजपने एकनाथ शिंदे यांनाच फोडून महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावला. या सर्व राजकीय प्रवासात राज ठाकरे राज्यात एकटेच पडल्याचे दिसत होते. मध्यंतरीच्या काळात मनसे आणि भाजप एकत्र येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. लोकसभेच्या निवडणुकीत मनसे महायुतीत सामिल होईल असे बोलले जात होते. भाजपच्या अनेक नेत्यांनी कृष्णकुंजवर वाऱ्या केल्या होत्या. परंतु राज ठाकरे यांनी भाजपला लोकसभा निवडणुकीत सशर्त पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.
मनसेने रेल्वे भरती प्रसंगी मुंबईत आलेल्या उत्तरभारतीयांवर केलेल्या हल्ल्यामुळे त्यांची उत्तरभारतात प्रतिमा नकारात्मक आहे. त्यामुळे राज ठाकरेसोंबत युती करण्याचा कोणताही राजकीय धोका भाजप पत्करत नव्हती. पंरतु यावेळी महाराष्ट्रातून 45 जागा निवडून आणण्याचे लक्ष निश्चित केल्याने भाजपने हा राजकीय धोका पत्करला आहे. ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर करताच विरोधकांनी मुंबईसह युपी आणि बिहार मधील जनतेला राज ठाकरेंसोबत केलेल्या युतीवरुन घेरण्यास सुरुवात केली आहे. विरोधक मनसे-भाजप युतीला या राज्यात किती हवा देतात त्यावर 2024 च्या भाजपचे निवडणुकीचे गणित बिघडण्याची शक्यता राजकीय समिक्षकांनी वर्तवली आहे. त्यामुळे असंगाशी संग केल्याचे प्रायश्चित भाजपला मिळू नये अशी प्रतिक्रिया भाजपच्या नवी मुंबईतील नेत्याने दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai