उद्धव ठाकरेंच्या अतिउत्साहाने महाविकास आघाडी तोंडघशी!
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 13, 2024
- 455
स्वीय सहायकासाठी शेकापशी घेतले राजकीय वैर
मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी मतदान पार पडले व संध्याकाळी निकाल जाहीर झाला. महायुतीच्या सर्वच 9 उमेदवारांचा विजय झाला आहे तर, महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. शरद पवार पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पराभूत झाल्याने महाविकास आघाडी ठाकरेंच्या स्वीय सहायकांच्या प्रेमापोटी तोंडघशी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुक टाळण्यासाठी सर्व पक्षांनी मिळून 11 उमेदवार निवडले होते. त्यात बेरजेचे राजकारण करत शरद पवार यांनी अलिबाग तालुक्यातील भाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. परंतु, उद्धव ठाकरे यांनी आपला स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांस अर्ज भरावयास लावून पवारांच्या मेहनतीवर पाणी फेरले. 12 उमेदवारांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमका कोण विजयी होणार याची उत्कंठा सर्वांना लागून राहिली होती. अखेर, मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून समर्थन पुरस्कृत उमेदवार होते. या निवडणुकीत काँग्रेसची 5 मतं फुटल्याचं प्रथमदर्शन दिसून येत आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भाजप महायुतीचा वरचष्मा दिसून आला.
जयंत पाटलांच्या पराभवामुळे महाविकास आघाडीने राज्यातील शेकापसारखा मित्र गमावल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात असून लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अनपेक्षित यशाने ठाकरेंच्या शिडात हवा भरली गेली असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश हे त्यांच्या कर्तुत्वाने मिळालेले नसून त्यांना सहानुभूतीपोटी मिळाले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे ठाकरे यांचे वर्तन असेच राहिल्यास आगामी विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे सहानुभूती गमावून बसतील आणि महायुती लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची व्याजासह परतफेड करेल असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
11 विजयी उमेदवार
भाजप
- योगेश टिळेकर
- पंकजा मुंडे
- परिणय फुके
- अमित गोरखे
- सदाभाऊ खोत
शिंदे सेना
- भावना गवळी
- कृपाल तुमाने
राष्ट्रवादी काँग्रेस
- राजेश विटेकर
- शिवाजीराव गर्जे
काँग्रेस
- प्रज्ञा सातव
ठाकरे गट
- मिलिंद नार्वेकर
- पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन
विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा विजय अनेक अर्थांनी भाजपसाठी महत्त्वाचा आहे. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होत्या. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज होते. लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळाल्याने पंकजा मुंडे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एन्ट्री झाली - काँग्रेसची मते फुटली?
आतापर्यंत समोर आलेली मतांची आकडेवारी पाहता काँग्रेसची पाच मतं फुटली असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काँग्रेसचे एकूण 37 आमदार आहेत. त्यापैकी 25 आमदारांनी पहिल्या पसंतीची मतं प्रज्ञा सातव यांना दिली. म्हणजे काँग्रेसची पहिल्या पसंतीची 12 मतं शिल्लक राहिली. मविआच्या नार्वेकरांना पहिल्या पसंतीची 22 मतं मिळाली. त्यात ठाकरे गटाची 15 मतं आहेत. उर्वरित सात मतं काँग्रेसची पकडली तरी पाच मतांचा प्रश्न राहतो.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai