अर्बन हाट येथे वसंत मेळ्याचे आयोजन

नवी मुंबई ः शिशिरातील पान गळतीनंतर निष्पर्ण वृक्ष पुन्हा एकदा कोवळ्या पालवीने, पाना-फुलांनी बहरू लागतात तेव्हा चाहूल लागते ती वसंत ऋतुची. ऋतुराज अर्थात सार्‍या ऋतुंचा राजा असलेल्या वसंत ऋतुच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी  सिडको अर्बन हाट येथे 04 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत सकाळी 11.00 ते रात्री 09.00 या वेळेत वसंत मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

वसंत मेळ्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, प. बंगाल, केरळ, कर्नाटक विविध राज्यांतील कलाकार व कारागीर आणि स्वयं सहाय्यता गट सहभागी होणार आहेत. या कालावधीत हातमागावर विणलेली वस्त्रप्रावरणे, रेशमी व सुती साड्या, ड्रेस मटेरियल, हस्तकला व कलाकुसरीच्या वस्तू, चामड्याच्या वस्तू, गालिचे, सारंगपूर फर्निचर, काष्ठ कला उत्पादने, बेडशीट, कृत्रिम दागिने, विविध शैलींतील चित्रे प्रदर्शनार्थ व विक्रीसाठी मांडण्यात येतील. या निमित्ताने नवी मुंबईकरांना एकाच छताखाली पारंपरिक व आधुनिक उत्पादने उपलब्ध होणार आहेत. तसेच खवय्यांच्या रसनातृप्तीसाठी मालवणी, कोल्हापुरी, राजस्थानी, केरळी असे विविध प्रांतांतील खाद्यपदांर्थाचे फुड स्टॉल उभारण्यात येणार आहेत. 

अर्बन हाट परिसर स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण असेल याची आयोजकांतर्फे पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. अर्बन हाटला भेट द्यायला येणार्‍या पर्यटकांनी आपल्याबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना आणून नये तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. वसंत मेळ्याकरिता प्रती दिन रु. 250, 300 आणि 400 भाडे या दराने स्टॉल उपलब्ध असून जीएसटी आणि वीज देयक स्वतंत्ररीत्या भरावे लागेल. अर्बन हाट येथे 4 समूहांमध्ये (क्लस्टर) मिळून एकूण 50 स्टॉल उपलब्ध आहेत. स्टॉल बुकिंगसाठी व्यवस्थापक, अर्बन हाट यांच्याशी संपर्क साधावा. अर्बन हाट येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या हिवाळी महोत्सवास (विंटर फेस्टिव्हल) नवी मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. या महोत्सवादरम्यान दर दिवशी सुमारे 200 ते 250 पर्यटकांनी भेट देऊन आपल्या पसंतीची मोहोर उमटवली होती. या महोत्सवात सहभागी झालेल्या कारागिरांपैकी 50% या महिला होत्या. यामुळे सध्याच्या कोविड-19 च्या काळात या कारागिरांना अर्थार्जनाची संधी मिळाली. फेब्रुवारी ते जून 2021 या कालावधीत अर्बन हाट येथे गुजरात महोत्सव, हातमाग प्रदर्शन, क्राफ्ट बाजार, गांधी शिल्प बाजार असे विविध महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत.