Breaking News
कलकत्ता येथील रुग्णालयात घडलेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला. त्यानंतर बदलापूर येथे दोन लहान मुलींसोबत अशाच प्रकारची घटना समोर आली. बदलापूरवासियांनी रास्ता रोको, रेल रोकोच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री शिंदे यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याच्या घोषणेबरोबर उज्ज्वल निकम यांची खटला चालवण्यासाठी नियुक्ती केली. मुंबई उच्च न्यायालयानेही घटनेची दखल घेत पोलिसांना फैलावर घेतले. दिल्लीत सर्वोच्च न्यायालयही भरात आले आणि डॉक्टरांच्या सुरक्षितेच्या प्रश्नापासून बलात्कारांच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. देशात गेल्या वर्षभरात गायब झालेल्या लाखो महिलांचा प्रश्नही ऐरणीवर आला. पुन्हा एकदा देशात निर्भया हत्येच्या घटनेची आठवण ताजी झाली. हे सर्व होऊनही दररोज बलात्काराच्या घटना घडतच आहेत, अनेक निर्भयांचा बळी जात आहे, अनेक द्रोपादींचे चीरहरण होत आहे. पण खाकी वर्दीतील राम, राजकीय कृष्ण आणि न्यायप्रविण रामशास्त्री प्रभुणे या बळी पडणाऱ्या द्रोपदींचे वस्रहरण रोखण्यासाठी असमर्थ ठरले आहेत.
सध्या महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. पूर्वीही महिलांवर अन्याय होत होते पण सामाजिक बदनामीला घाबरून त्याची तक्रार करत नसत. जसजशा महिला आत्मनिर्भर होऊ लागल्या, आर्थिक सुबत्ता आली तशा त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू लागल्या. अनेक क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत पण तेथेही महिला या पुरुषी वर्चस्वाच्या बळी ठरल्या आहेत. महिलांचे कामाच्या ठिकाणी शारीरिक शोषण होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने विशाखा समिती स्थापन केली. महिलांवरील अन्याय दूर व्हावा म्हणून प्रयत्न तर होत आहेत पण हे प्रयत्न कोठे तोकडे पडतात याचाही विचार सर्वानीच करणे गरजेचे आहे. सर्वानाच स्त्रीया नेहमीच सॉफ्ट टार्गेट वाटतात. अगदी घरातल्या भांडणांपासून ते मोठ्या युद्धातही पहिल्यांदा महिलांना टार्गेट केले जाते. त्यामुळे समाजाची स्त्रीयांप्रती असलेली मानसिकता अशा घटनांना जबाबदार आहे. हि मानसिकता जोपर्यंत बदलण्याचा प्रयत्न पुरुषी समाज व्यवस्थेकडून होत नाही तोपर्यंत तरी स्त्रीयांवरील अन्याय कायम राहतील.
ज्या देशात स्त्रीला शक्ती म्हणून संबोधले जाते आणि देवी म्हणून तिची पुजा होते त्याच देशात स्त्रीला विवस्त्र करून तिची धिंड काढली जाते यासारखे दुर्दैव नाही. सिंहासनावर बसलेल्या राजकर्त्यांना जीचे संरक्षण करावयाचे आहे तेच राजकर्ते आज देशात घडलेल्या प्रत्येक बलात्कारात, चीरहरणात नफा-तोट्याची राजकीय गणिते मांडत बसले आहेत यापेक्षा भयंकर काय असू शकते. कलकत्यात घडलेल्या घटनेची आठवण पंतप्रधानांना लालकिल्ल्यावर होते पण त्यांना वर्षभरापूर्वी हाकेच्या अंतरावर यौनशोषणाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या कुस्ती पैलवान महिलांचे रुदन ऐकायला येत नाही ही शोकांतिका आहे. मणिपूर येथे नग्न अवस्थेत महिलांची धिंड काढणाऱ्या समूहाच्या विरोधात साधा ब्र देखील त्यांनी काढू नये यातच राजकर्त्यांच्या मानसिकतेची प्रचिती येते. आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून अशी मानसिकता सध्या सर्वच राजकीय पक्षांची झालेली आहे. पंतप्रधानांच्या रुदनानंतर सर्वच पक्षांनी मग एकमेकांच्या राज्यात कसे बलात्कार होत आहेत याचा पाढाच वाचायला सुरुवात केली. बळी पडलेल्या स्त्रीवर झालेल्या अन्यायापेक्षा राजकर्त्यांचे हे वर्तन अधिक अन्यायकारक होते. मुळात अशा घटना रोखण्यासाठी सर्वानी मिळून एकत्र प्रयत्न करण्याऐवजी आपल्या विरोधी पक्षाच्या राज्यात अशी घटना घडण्याची गिधाडाप्रमाणे वाट पाहणारे राजकर्तेच समाजासाठी बलात्काऱ्यांहून अधिक घातक आहेत.
बलात्कार होण्याची अनेक कारणे आहेत. स्त्रीला नेहमीच समाजाने गृहीत धरले आहे. स्त्रीलाही स्वतःचे मत आणि आवड असते हे अजूनही न मानणारा वर्ग आहे त्यात शिकलेला वर्गही मागे नाही. त्यामुळे एखाद्या स्त्रीचा नकार हा न पचवता आल्याने बदलाच्या भावनेतून तिच्यावर अत्याचार केला जातो. जशी वैयक्तिक रागातून कृत्ये घडतात तशीच ती सामाजिक परिस्थितीमुळेही घडतात. निसर्गाने मुळात नर आणि मादी या दोन पेशी समाजाच्या सृजनासाठी निर्माण केल्या आहेत. मनुष्य जीव किंवा कोणताही प्राणी जन्मजात निसर्गाकडून भूक, मृत्यू आणि वासना घेऊनच जन्माला येतो. सजीवाची प्रत्येक गरज हि त्याचे वय आणि परिस्थितीनुसार बदलते. आज पुरुषाला किंवा स्त्रीला संगाची गरज आहे हे प्रमेय आपण विसरलो आहोत. पूर्वी शारीरिक भूक शमवण्यासाठी गावाबाहेर स्वतंत्र वस्त्या असत. गरजवंत आपली सोय अशा ठिकाणी करत. पण, आधुनिक युगात वेश्याव्यवसाय कायद्याने गुन्हा असल्याने त्याचाही संदर्भ अशा घटनांसाठी आपण घेऊ शकतो. आज माणसे कामानिमित्ताने वर्ष-वर्ष घराबाहेर राहतात, संगाविना आलेले नैराश्य ते मग अशा मार्गाने व्यक्त करतात. हे क्षणिक असते पण त्याचे परिणाम हे महाभयंकर असतात. आज अश्लीलतेची ओळख करून देणारी अनेक पॉर्न साईट एका क्लिकवर उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यातून निर्माण झालेल्या उर्जेला अशा चुकीच्या पद्धतीने वाट मोकळी करून दिली जाते. अनेकजण नशेच्या आहारी जातात आणि त्यातूनही असली भयानक जीवन उध्वस्त करणारी कृत्य हातून घडतात. यातून समाजात कसे बदल घडवून आणायचे हा यक्ष प्रश्न आहे.
निर्भया घटनेनंतर झालेल्या आंदोलनातून कायद्यात मोठे बदल केले. 12 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर आणि कायदे बदल्यावरही बलात्काराच्या घटना कमी झाल्या का? याचे उत्तर नकारात्मक द्यावे लागेल. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून गेल्या वर्षभरात 22000 बलात्काराच्या घटना घडल्या. ज्या घटनांची नोंदच झाली नाही अशा किती तरी भगिनी आजही उराशी दुःख कवटाळून असतील. कायदे करून जर गुन्हे कमी झाले असते तर एकही गुन्हा देशात घडला नसता. उलट निर्भया घटनेनंतर कायद्यात बदल केल्याने बलात्काराच्या बळी ठरलेल्या भगिनींना ठार मारण्याचा प्रघात पडला आहे. भावनेच्या लाटांवर केलेल्या कायद्यांचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या न्यायालयांनी बलात्काराचा गुन्हा हा अतिशय घृणास्पद मानून सहा महिन्यात त्याचा संपूर्ण निकाल लावण्याची व्यवस्था केली पाहिजे. शिंदे यांनी बदलापूर घटनेनंतर सर्वपक्षीय बैठक घेऊन गुन्हेगारांना योग्य संदेश देणे गरजेचे होते. गुन्हेगार कोणत्याही पक्ष असो त्याला बलात्कारासारख्या गुन्ह्यातून क्षमा नाही असे धोरण सर्वानीच अंगिकारले पाहिजे. पण न्यायव्यवस्था आणि राजकर्त्यांचे वैराग्य स्मशानवैराग्य ठरु नये. पीडितेला न्याय वेळेत देणे हाच तिला न्याय ठरेल अन्यथा व्यवस्थेने तिच्यावर केलेला हा पण बलात्कराच ठरेल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे