Breaking News
उबाठा गटाची महावितरण कार्यालयावर धडक; वीज समस्या सुरक्षित करण्याचे आश्वासन
उरण : एकीकडे ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यात दिवसभर उरण शहर आणि ग्रामीण भागातही बारा तासाहून अधिक काळ वीज गायब होत असल्याने उरणकर हैराण झाले आहेत. त्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी विजेच्या लपंडावामुळे महावितरणविरोधात संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेना उध्दव ठाकरे गटाने बुधवारी उरण महावितरणच्या कार्यालयावर जोरदार धडक दिली. त्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजेच्या समस्या गणेशोत्सवाच्या सणापुर्वी सुरळीत करण्यात येतील असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.
उरण शहर आणि ग्रामीण भागात बहुतांशी परिसरात विजेचा नेहमीचा लपंडाव सुरू आहे. मागील आठवड्याभरापासून पावसाने दडी मारल्याने उष्णतेत वाढ झाली आहे. या वाढत्या तापमानामुळे उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून विजेची आवश्यकता आहे. गणेशोत्सवाचा सण 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अनेक समस्यांचा सामना करण्याची वेळ मुर्तीकार आणि गणपती कारखानदारांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे श्रींच्या मूर्ती ग्राहकांना वेळेत देता येईल का याची चिंता संबंधितांना भेडसावू लागली आहे. विजेवर अवलंबून असणारे व्यापारी, दुकानदार वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. मागील 10-15 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. दिवसा- रात्री वारंवार गुल होणाऱ्या वीजेमुळे नागरिक पार त्रस्त झाले आहेत. वीजेच्या या वाढत्या खेळखंडोब्यामुळे मात्र महावितरण विरोधात परिसरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.याचा जाब विचारण्यासाठी बुधवारी उरण उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरणच्या महावितरणच्या कार्यालयावर जोरदार धडक दिली. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील वीजेच्या समस्या गणेशोत्सवाच्या सणापुर्वी सुरळीत करण्यात येतील असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहेत. उरण पूर्व विभाग मित्र परिवार तर्फेसुद्धा मोर्चा काढण्यात आला. त्यांनाही वीज सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले.
उरणच्या मुख्य विद्युतवाहिनीत बिघाड झाला असून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. तर उरण शहरातील वीज वारंवार खंडित होत असेल तर त्या संदर्भात दुरुस्ती करण्यात येईल असे महावितरणचे अभियंता संजय चाटे यांनी उरण पुर्व विभाग मित्र परिवाराला सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai