Breaking News
नवी मुंबई ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पालिका क्षेत्रातील 31 जुलैपर्यंत अर्ज भरलेल्या 50 हजाराहून अधिक महिलांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला आहे. 19,157 पात्र महिलांना त्यांचा अर्ज मंजूर झाल्याचे संदेश प्राप्त झाले आहेत, मात्र त्यांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न नसल्याने त्यांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा झालेली नसल्याचे निदर्शनास येत आहे. अशा महिलांचे आधार कार्ड विनाविलंब संलग्न करून घेण्याबाबत बँकांमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची व्यवस्था करावी असे सूचित करण्यात आले.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत 19,157 पात्र महिलांना त्यांचा अर्ज मंजूर झाल्याचे संदेश प्राप्त झाले आहेत, मात्र त्यांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न नसल्याने त्यांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा झालेली नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध बँकांच्या व्यवस्थापनांची विशेष बैठक अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्य लेखा वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, समाज विकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये ज्या महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी संलग्न नाही अशा महिलांचे आधार कार्ड विनाविलंब संलग्न करून घेण्याबाबत बँकांमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची व्यवस्था करावी असे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे या महिलांपर्यंत त्यांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न करून घेण्याच्या सूचना विविध माध्यमातून पोहोचवाव्यात असे सांगण्यात आले. त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरल्यानंतर अर्ज मंजूर झाल्याचा संदेश ज्या महिलांना प्राप्त झालेला आहे. तथापि त्यांच्या बँकेत अद्याप रक्कम जमा झालेली नाही, अशा महिलांनी आपले बँक खाते असलेल्या बँकेच्या शाखेत आधार कार्ड सोबत नेऊन आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. त्यानंतरच त्या महिलांच्या बँक खात्यात योजनेची रक्कम जमा होणार आहे याची नोंद घेण्यात यावी. शासनाने दिलेल्या सूचनेनुसार बँकेत पैसे जमा झाल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कपात न करता सर्वच्या सर्व रक्कम त्या महिलांना मिळावी अशाही प्रकारच्या स्पष्ट सूचना यावेळी बँकांना देण्यात आल्या.
त्याचप्रमाणे 31 जुलैपर्यंत नारीशक्ती दूत ॲपवरून 2301 महिलांचे अर्ज अपुऱ्या कागदपत्राविना अंशतः नाकारण्यात आले होते. तसेच 1 ऑगस्टपासून नवीन पोर्टल सुरू झाल्यानंतर 1567 महिलांचे अर्ज अपुऱ्या कागदपत्राअभावी अंशतः नाकारण्यात आले आहेत. अशा महिलांना कोणती कागदपत्रे अपूर्ण आहेत याबाबतचे संदेश त्यांच्या मोबाईलवर तांत्रिक प्रणालीद्वारे प्राप्त झालेले आहेत. त्या महिलांनी आपली आवश्यक योग्य कागदपत्रे दाखल करून अर्ज पुनर्सादर करावेत असेही आवाहन करण्यात येत आहे. या महिलांपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून पोहोचून त्यांची कागदपत्रे पूर्ण करून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai