Breaking News
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस वाहतूक विभागाकडून ट्रॅफिक बीट मार्शल असा नवीन उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांना अद्ययावत अशा 20 दुचाकी पुरविण्यात आल्या आहेत. या दुचाकी वाहनांचे वितरण आणि ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ 22 ऑगस्ट रोजी सुप्रसिध्द अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या हस्ते सीबीडी-बेलापूर येथील पोलीस आयुक्तालयात झाला.
आम्ही पडद्यावर काम करतो ते खोटे असते. मात्र, पोलीस जे काम करतात, ते खरेखुरे असते. त्यांना दरदिवशी विविध प्रकारच्या गुन्ह्यांसोबत फाईट करावे लागते. आम्ही सण साजरे करतो, तेव्हा पोलीस कामावर असतात. आम्हाला सुरक्षित जगता यावे यासाठी पोलीस सदैव तत्पर असतात, त्यामुळे पोलीस खऱ्या आयुष्यातील हिरो आहेत, असे मनोगत सुप्रसिध्द अभिनेता स्वप्नील जोशी यांनी सीबीडी येथे व्यक्त केले. याप्रसंगी सह-पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, विशेष शाखेच्या उपायुक्त रश्मी नांदेडकर उपस्थित होत्या.
पोलिसांच्या वर्दीची एक शान आहे, वर्दी घातल्यानंतर एक वेगळाच रिस्पेक्ट मिळतो, असे सांगतानाच नवी मुंबई वाहतूक विभागाने सुरु केलेल्या ट्रॅफिक बीट मार्शल या उपक्रमामुळे वाहतूक कोंडी अथवा रस्त्यावर झालेल्या अपघाताच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांना घटनास्थळावर तत्काळ पोहोचून मदत करणे शक्य होणार असल्याचे सांगत स्वप्नील जोशी यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. यावेळी सह-पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी लोकशाहीमध्ये काम करताना कायद्याची चौकट, लोकांच्या आशा आणि अपेक्षा, समाजातील विविध घटकांच्या संवेदना जाणून घेऊन, काम आणि कर्तव्य याचा बॅलन्स साधत पुढे जावे लागते. त्यामुळे मिलीटरी, पॅरामिलीटरी आणि पोलीस खात्यातील लोक एक प्रकारचे हिरोच आहेत. त्यामुळे पोलीस खात्याबाहेरच्या लोकांना पोलीस खात्याबद्दल खूप आकर्षण असते. ते आकर्षण कायम टिकवून ठेवत आपल्याला काम करावे लागणार असल्याचे सह-पोलीस आयुवत येनपुरे यावेळी म्हणाले.
यावेळी येनपुरे यांनी ट्रॅफिक बीट मार्शल उपक्रमाचे कौतुक करुन सदर उपक्रमामुळे जनतेला तातडीने चांगली सेवा मिळणार आहे. या बिट मार्शलना विविध टप्प्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सदर मोटरबाईक महामार्गावरही कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी बीट मार्शल म्हणून काम करताना स्वतःची काळजी घेण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai