Breaking News
राखीपौर्णिमेच्या पुर्वसंधेला रंगले कविसंमेलन
नवी मुंबई ः दिवसेंदिवस वाढत जाणारे महिला अत्याचार थांबणार तरी कधी आणि कसे, अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा कशी मिळले, न्याय मिळण्यासाठी आणि असे प्रकार रोखण्यासाठी सर्व यंत्रणांसह देवालाही प्रार्थना करुन आपल्या बहिणींच्या सुरक्षेसाठी साद घालणाऱ्या कवितांनी रविवारी स्वामी विवेकानंद संकुल विद्यालय शाळेतील सभागृह भावूक झाले. कविता डॉट कॉमच्यावतीने आयोजित केलेल्या या कविसंमेलनात उपस्थित कविंनी प्रबोधनात्मक, भावनिक आणि वास्तवावर भाष्य करणाऱ्या कविता सादर करुन उपस्थितींची मने जिंकली. तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून सहभागी स्पर्धकांपैकी तीन जणींना पैठणी भेट म्हणून देण्यात आली.
छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण बंद भावनांचे समुह, नवी मुंबई साहित्य परिषद आणि शिवतुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई, संवाद नात्यांचा कविता डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने राखापौर्णिमेनिमित्त खुले कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सानपाडा येथील स्वामी विवेकानंद संकुल विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री, लेखिका आणि रंगकर्मी असा त्रिसंगम असणाऱ्या कांचन प्रकाश संगीत या होत्या. तर छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार जोशी, नवी मुंबईतील ज्येष्ठ गझलकार आप्पा ठाकूर यांची विशेष उपस्थिती होती. दिपप्रज्वलनानंतर उपस्थित मान्यवरांना राखी बांधून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राखीपौर्णिमेच्या पुर्वसंधेला रंगलेल्या या कविसंमेलनात विविध विषयांवर सहभागी 30 कवींनी आपल्या कविता सादर केल्या. यामध्ये वाढत जाणाऱ्या महिला अत्याचारावर अनेक कवींनी आपली परखड मते व्यक्त करत महिलांच्या सुरक्षेसाठी साद घातली. स्त्रियांनी आपली भुमिका कशी बदलली पाहिजे, अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना कसा धडा शिकवला पाहिजे, नराधमांच्या शिक्षेसाठी काय बदल झाले पाहिजे अशा असंख्य प्रश्नावर पोटतिडकीने आपल्या भावना कवींनी व्यक्त केल्या. त्याचबरोबर श्रावण, पाऊस, प्रेम, रक्तदान अशा विविधांगी विषयांवर सादर केलेल्या कवितांनी प्रेषकांसह मान्यवरांना मंत्रमुग्ध केले.
राखीपौर्णिमेचे औचित्य साधुन कार्यक्रमात लकी ड्रॉच्या माध्यमातून तीन सहभागी कवयित्रिंना पैठणी साडी भेट म्हणून देण्यात आली. तसेच यावेळी महाराष्ट्रभूषण रांगोळीकार श्रीहरी पवळे यांनी काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शिवतुतारी प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.रविंद्र पाटील यांनी कविता डॉट कॉमचा दोन वर्षांचा प्रवास त्यामागील कष्ट, उद्देश आणि आगामी वाटचाल याविषयी माहिती देवून कार्यक्रमाची सांगता केली. निवेदक नारायण लांडगे-पाटील, कवी शंकर गोपाळे यांनी बहारदार सुत्रसंचालन करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी ज्येष्ठ सुलेखनकार विलास समेळ, उपाध्यक्ष जितेंद्र लाड, सचिव वैभव वऱ्हाडी, रांगोळीकार श्रीहरी पवळे, मुख्यध्यापिका ऋतुजा गवस, शिक्षिका मनिषा पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस