Breaking News
पनवेल ः पनवेल महापालिकाने फेरीवाले धोरण राबवून फूटपाथवरील बेकायदेशीर फेरीवाले हटवून फूटपाथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे करावे या मागणीसाठी मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला संघटकांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी नविन पनवेल येथिल फेरीवाल्या समस्या बाबत चर्चा केली व योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.
महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिवसेंदिवस अतिशय वाढत आहे. नवीन पनवेल शहरातील सर्व पादचारी रस्ते हे फेरीवाल्याने काबीज केले आहेत. शाळांच्या आसपासचा परिसर, रेल्वे स्टेशन, डीएव्ही शाळेजवळ, शिवा कॉम्प्लेक्स आणि सर्वत्रच हातगाड्यांनी रस्ते व्यापून गेलेले आहेत. सिडको उद्यानातून सुद्धा वडापाव, आरे स्टॉल, मटन विक्री असे व्यवसाय सुरु आहेत. सिडको कडून महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या दैनिक रोजगाराच्या आरक्षित भूखंडावर बेकायदेशीर अतिक्रमण करून तेथील टपऱ्या ह्या दरमहा पाच ते दहा हजार भाड्याने सुरु आहेत. या बेकायदेशीर व्यवहारामुळे भाजीवाले, लहान व्यवसायिक यांचे हाल होत आहेत. शहरातील सर्व पादचारी रस्ते फेरीवाल्यांनी भरून वाहत आहेत आणि रस्त्यावर हात गाड्यांची गर्दी होत आहे अशा असुरक्षित रस्त्यावरून रहिवाशांना, ज्येष्ठ नागरिकांना, शाळेतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
दैनिक आरक्षित बाजारावर केलेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करायचे, यावरून पालिकेला विकास कोणाचा करायचा आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन आज आठ वर्ष झालेली आहेत तरीसुद्धा नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि हक्काचा कोणताही विचार पालिका करत नाही. पालिका क्षेत्रातील अवैध फेरवाल्यांना कोणाची परवानगी मिळते असा प्रश्न उपस्थित करुन पालिकेने फेरीवाला धोरण राबवण्याची विनंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला संघटक अपूर्वा प्रभू यांनी निवदेनातून केली आहे. यावेळी संजय गोवेकर (विधानसभा संपर्कप्रमुख भुसावळ) सुगंधा शिंदे (उपतालुका महिला संघटक), विक्रांत पाटील (शिवसैनिक) सेजल खडकबाण (शाखा महिला संघटक) उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai