Breaking News
प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश
मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यासारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीने नागरिकांना प्रवासात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. ऐरवी तीन तासांचा असणारा प्रवास 8-10 तासांवर आला आहे. त्यामुळे जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी केली जात नाही, तोपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
मुंबई-नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्यांबाबत आणि त्याअनुषंगाने प्रवाशांना सामोरे जावे लागत असलेल्या समस्यांबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने मुंबई-नाशिक महामार्गाच्या सुधारण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. मुंबई-नाशिक महामार्ग हा उत्तर महाराष्ट्राला राज्याच्या राजधानीशी जोडणारा महत्त्वाचा व प्रमुख मार्ग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. सध्या या महामार्गावर आसनगाव, वाशिंद यासह इतर काही ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरु आहेत. त्यातच मुसळधार पावसामुळे महामार्गावर प्रचंड खड्डे पडले असून त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. गेला महिनाभर प्रचंड मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रास प्रवाशांना सहन करायला लागला असतानाही सरकारने रस्त्याच्या डागडुजीकडे फारसे लक्ष दिले नाही. याउलट सरकारने टोलवसूली सुरुच ठेवल्याने मोठा जनक्षोभ सरकारविरोधात उसळला आहे. तीन तासांच्या नाशिक ते मुंबई अंतरासाठी प्रवाशांना 8 ते 10 तास खर्च करावे लागत आहेत. वास्तविक पाहता, टोलवसूली करणाऱ्या कंपनीने सदर महामार्गाची दुरुस्ती युद्धपातळीवर करणे आवश्यक होते परंतु, राजकीय संरक्षणामुळे कंत्राटदाराकडून त्यात कुचराई झाल्याचे पहायला मिळत आहे. कोणतीही दंडात्मक कारवाई संबंधित ठेकेदारावर झाली नसल्याने ठेकेदार सरकारचा जावई आहे का? असा सवाल टोल भरणारे वाहनधारक विचारत आहेत.
लोकसभा निवडणुकीत लोकांच्या नाराजीचा फटका बसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा फटका बसू नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या दालनात मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीसाठी बैठक बोलावली होती. याबैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करून खड्ड्यांसह नादुरुस्त रस्त्यांचे ड्रोनद्वारे व्हिडिओ तयार करावेत तसेच जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी केली जात नाही, तोपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. याबैठकीत पवार यांनी रस्त्याच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करुन सर्व उपाययोजना पुढील 10 दिवसांत उपाययोजना राबवाव्यात अन्यथा महामार्गावरील वाहतूक सुरळित न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांना दिले.
महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, भिवंडी, कल्याण व नाशिक महापालिका आयुक्त अशा संबंधित यंत्रणांचे समन्वयन साधून अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करून एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देश पवार यांनी दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai