Breaking News
नवी मुंबई ः वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शहर स्वच्छतेत तसेच पर्यावरण रक्षण संवर्धनात नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिली असून याच धर्तीवर जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंब्याच्या कोयी संकलनाची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमाचे नागरिकांकडून महानगरपालिकेची प्रशंसा करीत उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले असून या उपक्रमास उत्तम प्रतिसाद देत 50 हजाराहून अधिक आंब्याच्या कोयींचे संकलन करण्यात आले आहे.
यामध्ये शहरातील ज्युस सेंटर्स, रेस्टॉरंट्स व हॉटेल्स येथून आंब्याच्या कोयी संकलन करण्यात येत आहेतच शिवाय सोसायट्यांमधील नागरिकही आपल्याकडील आंब्याच्या कोयी धुवून व सुकवून पालिकेने यासाठी तयार केलेल्या विशेष वाहनात देत आहेत. स्वच्छ भारत मिशनमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण हा अत्यंत महत्वाचा घटक असून कोयी संकलन उपक्रमामुळे सर्वसाधारणपणे नागरिकांकडून ओल्या कचऱ्यात टाकून दिल्या जाणाऱ्या कोयी वेगळ्या काढल्या जाणार असून त्या कोयींतून वृक्षरोपे तयार केली जाणार असल्याने निसर्गाचे देणे निसर्गाला परत करून वसुंधरा रक्षण संवर्धनाचेही काम होणार आहे.
मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या आंब्याच्या कोयींमधून नमुंमपा उद्यान विभागामार्फत आंब्याची रोपे निर्माण करण्यासाठी काही कोयी ठेवून अधिकच्या कोयी रेड एफएम रेडिओ वाहिनीकडे सुपूर्द केल्या जाणार आहेत. वाहिनीकडे संकलित होणाऱ्या कोयी ते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत आंबा रोप लागवडीसाठी पोहोचवून त्यांना शेतीसोबत उदरनिर्वाहाचा आणखी एक पर्याय उपलब्ध करून देत आहेत. तरी नागरिकांनी आंब्याचा आस्वाद घेऊन झाल्यानंतर त्यांच्या कोयी ओल्या कच-यात न टाकता एखाद्या भांड्यात स्वच्छ धुवून घ्याव्यात आणि उन्हात सुकवाव्यात व नवी मुंबई महानगरपालिकेने यासाठी तयार केलेल्या विशेष वाहनात 15 जूनपर्यंत वर्तमानपत्रात गुंडाळून अथवा बॉक्समध्ये द्याव्यात असे आवाहन करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai