Breaking News
शहर स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांचे निर्देश
नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण 2024 ला सामोरे जाताना स्वच्छता विषयक विविध उपक्रमांमध्ये व दैनंदिन बाबींमध्ये अधिक व्यापक लोकसहभाग घेण्यासाठी प्रयत्न केले जावेत असे निर्देशित करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शाळा व महाविदयालयीन विदयार्थी यांच्यासह त्यांच्या पालकांपर्यंत स्वच्छता संदेशाचे प्रसारण होण्याच्या दृष्टीने व्यापक कार्यवाही करावी असे सूचित केले. स्वच्छतेची कार्यवाही नियमीतपणे होण्यासाठी नियुक्त केलेले नोडल अधिकाऱ्यांनी त्या विभागाचे स्वच्छताविषयक पालक अधिकारी म्हणून काम पाहावे असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध कामांचा बारकाईने आढावा घेताना आयुक्तांनी स्वच्छता ही आपल्या शहराची ओळख असल्याने ती अधिक उंचावणे ही आपली जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले व या कामी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा चालणार नाही असे स्पष्ट निर्देश दिले. स्वच्छतेची कार्यवाही नियमीतपणे योग्य रितीने होण्यासाठी व त्यावर त्रयस्थ यंत्रणेचे निरीक्षण असावे यादृष्टीने आठही विभागांसाठी विभागप्रमुख दर्जाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून या अधिकाऱ्यांनी त्या विभागाचे स्वच्छताविषयक ‘पालक अधिकारी' म्हणून काम पाहावे असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. नवी मुंबईतील शाळा महाविदयालयामध्ये शिकणारी मुले व युवक हे आपल्या शहराचे भविष्य असल्याने स्वच्छता अभियानात त्यांना मोठया प्रमाणावर सक्रिय सहभागी करुन घेणे. कचऱ्याचे घरापासूनच वर्गीकरण केले जाण्यावर व तो घंटागाडीत वेगवेगळा दिला जाईल अशी दक्षता घ्या. इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचा ई-कचरा संकलित करण्यासाठी ठराविक दिवस निश्चित करावा आणि तो जाहीर करुन त्यादिवशी ई-कचरा संकलन मोहीम नियमीतपणे राबवावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai