Breaking News
सोयी सुविधा पुरवण्यासाठी नमुंमपा सज्ज
नवी मुंबई : नवी मुंबई पालिकेतून बाहेर पडलेली 14 गावे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केल्याचा निर्णय 22 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला होता. परंतु प्रत्यक्ष कार्यवाही कधी होणार याची प्रतीक्षा या गावकऱ्यांना होती. आता ही गावे व त्यासंबंधीच्या कामकाजाची जबाबदारी पालिकेच्या एका कार्यकारी अभियंत्यावर सोपवण्यात आली आहे. यावरुन येथील सोयी सुविधा पुरवण्यासाठी नमुंमपा सज्ज झाल्याचे दिसते.
नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणेज 1992 मध्ये या 14 गावांचा समावेश नमुंमपा मध्ये करण्यात आला होता. मात्र कराचा बोजा वाढल्याने तसेच त्यातूलनेत सुविधा मिळत नसल्याची भुमिका घेऊन ही 14 गावे नवी मुंबई महापालिकेतून बाहेर पडली. त्यानंतर अद्यापपर्यंत ती कोणत्याही महापालिकेत समाविष्ट झाली नाही. त्यामुळे मागील काही वर्ष विकासापासून वंचित असलेल्या 14 गावांना पुन्हा नवी मुंबईत सामावून घेण्याची उत्सुकता होती. गेल्या सहा वर्षांपासून या गावांचा समावेश नवी मुंबईत व्हावा यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु होते. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर या 14 गावांमधील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. परंतु गावे नवी मुंबई पालिकेत सामावून घेण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही कधी होणार याची प्रतीक्षा या गावकऱ्यांना होती. आता या गावांचा समावेश महापालिकेत करण्यासाठी पालिकेने प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासंबंधीच्या कामकाजाची जबाबदारी सांभाळण्यासाठी पालिकेने काही अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यासाठी परिमंडळ 2 च्या ऐरोली विभाग कार्यालयातील कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे यांची नेमणुक करण्यात आली आहे. गावातील मालमत्ता ताब्यात घेऊन त्यानंतर सोयीसुविधा पुरवण्याची कार्यवाही करण्यात येईल. पालिकेकडून कार्यवाही सुरु झाल्याने येथील ग्रामस्थांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai