Breaking News
विधानसभा सदस्यांनी सरकारचे वेधले लक्ष ; रिक्त पदे भरण्याची मागणी
नवी मुंबई : सिडको महामंडळात मंजूर पदांपेक्षा निम्म्याहून अधिक पदे रिक्त असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. याशिवाय विविध संवर्गातील सव्वाशे हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या अनेक महिन्यांपासून रखडल्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. याबाबत विधानसभा सदस्यांनी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करत शासनाने याप्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तत्काळ मागविला आहे.
विधानसभा सदस्य राम कदम, योगेश सागर व सुरेश (राजूमामा) भोळे यांनी सिडकोतील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश बुधवारी नगरविकास विभागाने सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत. त्यामुळे सिडकोतील 1619 रिक्त पदे भरण्यास दिरंगाई करणाऱ्या सिडको व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहेत. शहरांचे शिल्पकार म्हणून प्रसिध्द असलेल्या सिडको महामंडळात मंजुर पदांपेक्षा निम्म्याहून अधिक पदे रिक्त असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. परिणामी सिडकोत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना काम पुर्ण होईपर्यंत सतत हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यात सिडकोत काम करणाऱ्या विविध संवर्गातील जवळपास सव्वाशे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या अनेक महिन्यांपासून रखडल्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये निरुत्साह आढळून येत आहे.
सिडकोतील मनुष्यबळाची कमतरता भरुन काढण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध तयार करुन व्यवस्थापनाने सदरच्या प्रस्तावाला 15 जून 2016 रोजी संचालक मंडळाने मंजुरी दिली होती. परंतु, आकृतीबंध मंजूर होऊन देखील त्याची अंमलबजावणी करण्याचे सौजन्य सिडको व्यवस्थापनाने न दाखवलेले नाही. नव्याने तयार केलेल्या आकृतीबंधानुसार सिडकोत 2797 पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत 1178 अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. तर निम्म्याहून अधिक म्हणजेच तब्बल 1619 पदे रिक्त आहेत. याशिवाय मनुष्यबळ पुरविणाऱ्या खाजगी एजन्सीमार्फत 300 कर्मचारी सिडकोत कार्यरत आहेत. मध्यंतरीच्या काळात सरकारद्वारा सर्व शासकीय कार्यालयातील नोकरभरती बंद राहिल्याने सिडकोतील रिक्त पदांची संख्या देखील वाढत गेली आणि कालांतराने सिडकोच्या मंजूर पदांपेक्षा निम्याहून अधिक पदे (जवळपास 1600 हून अधिक) रिक्त राहिली आहेत. प्रारंभी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत पदोन्नत्या केल्या गेल्या नाहीत. त्यानंतर कोकण पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचे कारण देऊन पदोन्नत्या थांबवण्यात आल्या. या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही पदोन्नत्या करण्यास व्यवस्थापनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai