Breaking News
नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर येथील शाहबाज गावात पहाटे इमारत कोसळून तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. इंदिरा निवास ही इमारत दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ही इमारत अचानक कोसळली.
इमारत एका बाजूला कलल्याचे निदर्शनास आल्यानंतर रहिवाशांना इमारतीमधून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे इमारतीमध्ये वास्तव्य करणारे 48 रहिवासी बचावले. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे बचाव पथक आणि एनडीआरएफच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. तेथील रहिवाश्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 05 व्यक्ती मलब्याखाली दबले गेले असल्याची शक्यता लक्षात घेत शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोध कार्यादरम्यान मलब्याखालून लल्लुददीन नाझीर पठाण (पुरुष -वय 23 वर्ष) आणि रुखसार ललुददीन पठाण (महिला-वय 19 वर्ष) अशा 02 व्यक्तींना बाहेर काढण्यात आले व त्यांना महानगरपालिकेच्या सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे तात्काळ दाखल करण्यात आले. यात मोहम्मद मिराज, शफील अन्सारी आणि मिराज अन्सारी यांचा मृत्यू झाला.
ही चार मजली इमारत अनधिकृत होती. पालिकेने नोटीसही बजावली होती. ही इमारत रात्री अचानक कलली. हा प्रकार याच भागात राहणारा रिक्षाचालक आणि केशकर्तनालय चालवणाऱ्याच्या निदर्शनास आले. त्यांनी रहिवाशांना बाहेर काढले. या इमारतीमध्ये एकूण 3 दुकाने व 17 सदनिका होत्या. या इमारतीचा विकासक तसेच मूळ मालक यांच्यावर बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारतीतून बाहेर काढलेल्या नागरिकांची महापालिकेच्या निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे. या घटनेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक इमारतींमधील रहिवास नागरिकांनी त्वरित थांबवावा. तेथील वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबई पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai