Breaking News
सिडकोकडून वाटप रखडले
उरण : सिडकोकडून नवी मुंबई प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या जमिनींच्या वाढीव दराच्या कोट्यवधी रुपयांचे वाटप थकले आहे. हे वाढीव दर लवकरात लवकर देण्याची घोषणा विधानसभेत देऊनही शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे शासनाचे हे आश्वासन कागदावरच राहिले आहे.
सिडको आणि शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीला वाढीव मोबदला मिळावा यासाठी न्यायालयात दावे केले आहेत. त्यांचे निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागूनही अनेक वर्षे सिडकोकडून वाढीव मोबदल्याच्या रकमा दिल्या जात नाहीत. त्या रकमाही येत्या काळात देण्यात येतील असे आश्वासन पालकमंत्र्यांनी विधानसभेत दिले आहे. मात्र अनेक खेपा मारूनही शेतकरी आणि त्यांच्या वारसांना वाढीव दराच्या रकमा दिल्या जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हजारो कोटी रुपयांची देणी थकली आहेत.
सिडकोने नवी मुंबई शहराच्या विकासासाठी उरण, पनवेल व ठाणे-बेलापूर पट्टीतील शेतकऱ्यांच्या जमिनी 1985- 86 साली 5 रुपये प्रतिचौरस मीटर इतक्या अल्प दराने संपादित केल्या आहेत. या दराच्या विरोधात शेतकरी न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे न्यायालयाकडून शेतकऱ्यांना सिडकोकडून वेगवेगळ्या विभागांतील जमिनींचे वेगवेगळे वाढीव दर दिले जात आहेत. यामध्ये प्रतिचौरस मीटरचा दर 300 रुपये ते 1 हजार 725 रुपयांपर्यंत दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वारसांना 1 कोटी रुपयांपासून ते 25 कोटी रुपयांपर्यंतचा वाढीव दर मिळत आहेत.
न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर जमिनीचा वाढीव मोबदला न दिल्याने सिडको आणि शासनाला अधिकच्या व्याजापोटी शेकडो कोटी रुपये मोजावे लागत आहेत. हे व्याज 15 टक्क्यांवर पोहोचले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. न्यायालयात अनेक दावे प्रलंबित आहेत. त्यामुळे शेकडो कुटुंबांना या वाढीव दराची प्रतीक्षा आहे. संपत्तीच्या वाट्यासाठी बहीण-भाऊ यांच्यात न्यायालयात खटले सुरू आहेत. उरण तालुक्यात अशा प्रकारचे 1 हजार 500 हून अधिकचे दावे न्यायालयात दाखल आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai