Breaking News
संदीप नाईक यांची महावितरण कडे मागणी
नवी मुंबई ः माजी आमदार तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे सृजनांशी संवाद या उपक्रमांतर्गत बेलापूर मतदारसंघातील विविध नोडमधील सोसायटी, गावठाण क्षेत्रातील दौरा करत असताना अनेक नागरिकांनी महावितरण मंडळाशी निगडित समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. या सर्व समस्यांची तातडीने दखल घेत संदीप नाईक यांनी शिष्टमंडळासह विद्युत वितरण मंडळाचे अधीक्षक-अभियंता गोरखनाथ बेले यांची भेट घेतली. सर्व वीज समस्या दिवाळीपूर्वी तातडीने सोडविण्याची मागणी केली.
नवी मुंबई शहर हे सर्वाधिक विद्युत शुल्क भरणारे शहर असताना देखील आज येथील नागरिकांना विजेच्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे संदीप नाईक यावेळी म्हणाले. बहुतेक ठिकाणी महावितरणच्या सब स्टेशनची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. सिमेंट आणि पेंट निघाला आहे. बांधकामातील सळया बाहेर आलेल्या आहेत. भविष्यात या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू शकते. काही सब स्टेशन गर्दुले, मद्यपी असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सब स्टेशनच्या सुरक्षिततेसाठी तातडीने अभियान राबवून अशी मागणी त्यांनी केली. अनेक ठिकाणी बॉक्स उघडे आहेत. उघड्या केबल्स आणि जीर्ण झालेल्या केबल्समुळे विजेचा लोड घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे घरातील उपकरणे बिघडत आहेत. दुर्घटना होत आहेत असे सांगून संदीप नाईक यांनी उघड्या केबल्स आणि डीपी बॉक्स सुरक्षित करण्याची सूचना केली. दिवाळीच्या आधी विद्युत संबंधी समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी संदीप नाईक यांनी केली. त्यावर अधीक्षक-अभियंता बेले यांनी लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai