Breaking News
महारेराचा निर्णय; प्रवर्तकाला द्यावे लागणार हमीपत्र
मुंबई : एकाच भुखंडावर उभारलेल्या प्रकल्पाला विविध कारणास्तव एकापेक्षा जास्त महारेरा नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज करीत असल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे. यामुळे घर खरेदीदारांची फसवणुक होवू शकते. हे टाळण्यासाठी महारेराने एका भुखंडाला एकच नोंदणीक्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढे राज्यात एका प्रकल्पाला एकच नोंदणी क्रमांक मिळणार आहे.
आता गृहनिर्माण प्रकल्पाच्या नवीन नोंदणीसाठी येणाऱ्या प्रत्येक प्रवर्तकाला विहित प्रपत्रांमध्ये स्वतःच्या नाममुद्रित पत्रावर प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेवर किंवा जागेच्या कुठल्याही भागावर महारेरा नोंदणी क्रमांक अस्तित्वात नाही, त्यासाठी अर्जही प्रलंबित नाही याची हमी जागेच्या सिटी सर्वे क्रमांक, प्लॉट क्रमांक, हिस्सा क्रमांक, गट क्रमांक इत्यादीसह जागेच्या संपूर्ण तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी लागणार आहे. प्रवर्तकाने नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेल्या हमीपत्रात चुकीची, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिलेली आढळल्यास अशा प्रवर्तकावर महारेरा कारवाई करणार आहे.
काही प्रवर्तक संबंधित भूखंडावर पूर्वीचा महारेरा नोंदणीक्रमांक असतानाही, महारेराला कल्पना न देता, त्याबाबत विविध कारणास्तव एकापेक्षा जास्त महारेरा नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज करीत असल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी जमीन मालक, प्रवर्तक वेगवेगळे असल्याने ते स्वतंत्रपणे आणि काही ठिकाणी जमीन मालक एकापेक्षा जास्त प्रवर्तकाशी करार करीत असल्याने, असे होत असल्याचे आढळून आले आहे. यातून प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास व अशा इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येतात. परिणामी महत्त्वाच्या सोयी मिळण्यात अडचणी निर्माण होऊन घरखरेदीदारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा, एका प्रकल्पासाठी एकापेक्षा जास्त महारेरा नोंदणी क्रमांक नोंदवला जाऊ नये, म्हणून महारेराने हा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक प्रकल्पात त्या प्रकल्पासाठी विशेषत्वाने आणि त्या लेआऊट मधील सामाईक कुठल्या सोयीसुविधा असतील याबाबत सुधारणा, दुरूस्ती, खारीज, फेरफार, सामाईक, मनोरंजन, खेळाचे मैदान, पार्किंग, अंतर्गत रस्ते, स्विमिंग पूल , क्लब हाऊस अशा सर्व सोयीसुविधांबाबत, यातून तक्रारी, वाद होऊ नये यासाठी स्पष्टपणे प्रत्येक टप्प्याच्या नोंदणीच्यावेळी नोंदवावे लागेल, असेही या नवीन परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai