Breaking News
भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाल्यामुळे जग एका सर्वोत्कृष्ट उद्योजकाला मुकले. ते उद्योजक असले तरी भांडवल गुंतवून नफखोरी करणाऱ्यांतले नव्हते. त्यांच्या दृष्टीने माणसातील गुंतवणूक महत्त्वाची होती. सायरस मिस्त्री यांनी टाटांच्या नफ्यातील वाटा सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करण्यास हरकत घेतली, तेव्हा आपल्या उत्तराधिकाऱ्याला बाहेर काढण्याचे धाडस दाखवले. त्यांच्यात एक सहृदयी समाजसेवक दडलेला होता. ‘टेल्को' मध्ये महिलांना घेतले जात नव्हते, तेव्हा सुधा कुलकर्णी (मूर्ती) यांनी पाठवलेल्या पोस्ट कार्डची दखल घेऊन महिलांना अभियांत्रिकीचे नोकरीचे दालन खुले केले. रतन टाटा हे असे व्यक्तिमत्व होते, की त्यांच्यासारखे होणे प्रत्येकाला शक्य नाही.
सुरुवातीच्या अभ्यासानंतर 1959 मध्ये रतन टाटा यांनी आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचा अभ्यास केला आणि नंतर अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात गेले. 1962 मध्ये ते भारतात परतले आणि टाटा स्टीलच्या माध्यमातून व्यवसायक्षेत्रात प्रवेश केला. एक कर्मचारी म्हणून ते सुरुवातीला सामील झाले आणि जमशेदनगर प्लांटमध्ये कर्मचारी म्हणून काम केले. 1991 ते 2012 या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते आणि या काळात त्यांनी टाटा समूहाला मोठ्या उंचीवर नेले. जेव्हा जेव्हा त्सुनामी किंवा कोरोनासारखी संकटे देशावर आली, तेव्हा त्यांनी तिजोरी उघडी केली. टाटा समूहाला मोठ्या उंची नेण्याबरोबर स्वतःची उदार प्रतिमाही निर्माण केली व लोकांसाठी ते प्रेरणास्थान बनले. देशातील प्रत्येकजण, मग तो छोटा व्यापारी असो वा मोठा व्यापारी, व्यावसायिक जगतात उतरणारा तरुण त्यांना आपला आदर्श मानतो.
1996 मध्ये टाटांनी ‘टाटा टेलिसर्व्हिसेस' या दूरसंचार कंपनीची स्थापना केली आणि 2004 मध्ये ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' (टीसीएस) बाजारात सूचीबद्ध झाली. आज जगात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगार देणारी अग्रगण्य कंपनी आहे. कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल, तर ते काम एकट्याने सुरू करा; पण ते काम मोठ्या उंचीवर नेण्यासाठी लोकांची साथ आवश्यक आहे, असे ते सांगायचे. टाटा यांना प्राण्यांची, विशेषतः भटक्या कुत्र्यांची खूप आवड होती. अनेक स्वयंसेवी संस्था आणि ‘ॲनिमल शेल्टर्स'नाही ते देणगी देत असत. आर्थिक संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यातही ते पुढे असत. त्यांना कार चालवण्यापासून पियानो वाजवण्याचा छंद होता. फ्लाइंगही त्यांच्या आवडत्या छंदांच्या यादीत टॉपवर होते.
टाटा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात टाटा समूहाने टेटली टी, जग्वार लँडरोव्हर आणि कोरस या कंपन्या ताब्यात घेतल्या. आज टाटा समूहाचा व्यवसाय मीठ-मसाले, पाणी-चहा-कॉफी, घड्याळे-दागिने असो की आलिशान कार, बस, ट्रक आणि विमानप्रवास अशा अनेक क्षेत्रांमध्ये पसरला आहे. निवृत्तीनंतर रतनजींनी स्वत:ला स्वयंसेवी संस्थाच्या कामात झोकून घेतले. टाटा यांनी देशाला पहिली ‘मेड इन इंडिया' कार दिली. निवृत्ती नंतरही ते टाटा कंपनीचे सर्वात मोठे मार्गदर्शक म्हणून ते काम करत होते.
टाटा यांनी भारतीय बनावटीची टाटा इंडिका कारचे उत्पादन देशात सुरू केले. नॅनो ही जगातील सर्वात स्वस्त कार बनवण्याचे यशही त्यांच्या नावावर आहे. ते पायलट होते. ते एफ 16 फाल्कन विमान उडवणारे भारतातील पहिले व्यक्ती बनले. त्यांच्या कलेक्शनमध्ये जगातील उत्तमोत्तम गाड्यांचा समावेश होता. मुंबईतील आयआयटीला संशोधनासाठी त्यांनी 95 कोटींची देणगी दिली. याशिवाय त्यांनी कोरेल विद्यापीठाला 28 दशलक्ष डॉलर्स दान केले. कोरोनाच्या काळात कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत होत्या, तेव्हा त्यांनी त्याला विरोध केला होता. त्यांच्या ठायी माणुसकी ओतप्रोत भरली होती.
1999 मध्ये टाटा समूहाची कार उत्पादक कंपनी नीट चालत नव्हती. फोर्ड कंपनीने ही कंपनी खरेदी करावी म्हणून ते आपल्या अधिकाऱ्यांसह फोर्डचे मालक विल फोर्ड यांना भेटायला गेले. त्यावेळी तोट्यात जाल अशी कार बनवण्याचा सल्ला कोणी दिला, असा सवाल विल फोर्ड यांनी टाटा यांना केला. फोर्ड ग्रुपने ही कंपनी विकत घेतली, तर ते तुमच्यावर उपकार असेल, असेही ते म्हणाले. हा टोमणा फक्त स्वाभिमानाला मारलेला असता, तर त्यांनी तो सहन केला असता; पण ती भारतातील आघाडीची कार कंपनी होती. त्यामुळे राष्ट्राच्या स्वाभिमानाचाही प्रश्न निर्माण झाला. टाटा करार न करता परतले. पुढे फोर्ड कंपनीची आर्थिक स्थिती ढासळू लागली. तेव्हा मात्र विल फोर्ड यांनी टाटा यांना लँड रोव्हर आणि जॅग्वार कंपनी विकत घेण्यासाठी साकडे घातले. टाटांनी कंपनी विकत घेतली. ही कंपनी भारताला गुलाम बनवणाऱ्या ब्रिटनची शान मानली जात होती. ब्रिटनचे ते वैभव भारताच्या मानसन्मानाच्या अधीन झाले आणि टाटांनीही फोर्डला त्यांची जागा योग्य मार्गाने दाखवली.
रतनजी हे कमालीचे खंबीर होते हे त्यांनी 26/11 ला त्यांच्या मालकीच्या ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्यानंतर आपल्या वागणुकीने दाखवून दिले. सहा महिन्यात ताज हॉटेल जसे होते तसे उभे केलेच. परंतु, हे करत असताना ज्या कर्मचाऱ्यांचा बळी या हल्ल्यात गेला त्यांच्या कुटुंबियांनाही त्यांनी वाऱ्यावर सोडले नाही. प्रसंग कसाही असो टाटा नेहमीच त्याला सामोरे गेले. मोठा उद्योगपती असताना देशप्रेमही त्यांच्या ठायी ओतप्रोत भरले होते. स्वाभिमान ही त्यांची सर्वात मोठी ओळख होती. भारताच्या फायद्यासाठी त्यांनी भांडवल आणि नफ्याच्या खेळात विजय-पराजय अत्यंत तुच्छ: मानले.
टाटा यांचे देशभक्तीचे किस्सेही अनेक आहेत. भारतीय सेनेला लागणारे ट्रक टाटा मोटर्स बनवते. अतिशय उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि सामुग्री वापरून हि निर्मिती केली जाते. एकदा पाकिस्तानने टाटामोटोर्सकडे त्यांच्या सैन्यासाठी ट्रकची मागणी केली. पण टाटांनी ट्रक देण्यास नकार दिला. हे डील व्हावे म्हणून तेव्हाच्या एका मंत्र्याने टाटांना फोन केला पण रतन टाटा माझ्या देशाविरोधात लढणाऱ्या पाकिस्तानला ट्रक देणार नाही सुनावून शेकडो कोटीच्या ऑर्डरला लाथ मारली. अशी जाज्वल्य देशभक्ती आणि निस्पृह देशप्रेम एका उद्योजकाकडे असणे आणि असा उद्योजक भारताचा सुपुत्र असणे हे जशी देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे तशीच ती प्रत्येक भारतीयांसाठीही आहे. टाटासन्स या जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या उद्योग समूहाचे मालक असूनही त्यांनी जीवन अत्यंत साधेपणाने व्यथित केले. सध्या तीन बेडरूमच्या घरात ते कायम राहिले. पैसे आहे म्हणून त्यांनी 27 माळ्यांची इमारत बांधून संपत्तीचे प्रदर्शन नाही केले. ते पारसी होते पण हिंदू धर्मात सांगितलेले वैराग्य जीवन आयुष्यभर जगले. आज ही महान हस्ती आपल्यामध्ये नाही पण त्यांचे कार्य सदैव देशवासियांना प्रेरणा देत राहील. रतन टाटा यांना भावपुर्ण आदरांजली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे