Breaking News
माथाडी कामागारांचे आराध्यदैवत स्व. अण्णासाहेब पाटील यांची 23 मार्च 2020 रोजी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.
लाखो माथाडी, कष्टकरी कामगारांना समाजात ताठ मानेने जगायला शिकवणारे अण्णासाहेब पाटील यांचा जन्म पाटण तालुक्यातील मुंद्रुळ-कोळे या छोट्याश्या खेड्यात झाला. घरच्या गरीब परिस्थितीमुळे मेटाकुटीला आलेला परंतु आवड असल्याने थोडेफार शिक्षण पदरी घेणारा हा सुपुत्र मुंबईत पोटाची खळगी भरण्यासाठी आला. सुरवातीस उसाच्या गुजहाळावर काम सुरू केले. त्यानंतर दारूखाना परिसरातील वखारीत काम केले. दरम्यानच्या काळात कामगारांची मालकांकडून होणारी पिळवणूक, कामाचा कमी मोबदला आणि कामगारांना मिळणारी हीन वागणूक अण्णासाहेबांच्या मस्तकाची शीर हालवित असे. त्यांच्या तळपायाची आग मस्ताकाला भिडत. या तळागाळातील कामगारांना कुठे तरी न्याय मिळावा, त्यांचे जीवनमान सुधारावे असे त्यांना वाटत. परंतू, यासाठी कामगारांची एकता असणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी संघटना उभी करणे गरजेचे आहे, हे अण्णासाहेबांनी जाणले आणि त्याच तळमळीपोटी माथाडी कामगारांची चळवळ त्यांनी उभी केली. सन 1962 साली उभ्या केलेल्या चळवळीला 1964 साली महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन (रजि.) असे मुर्त स्वरूप मिळाले. अंग मेहनतीची, मालाची चढ-उतार करणार्या आणि कोणीही वाली नसणार्या या कामगारांना युनियनच्या माध्यमातून अण्णासाहेबांसारखे एक खंदे नेतृत्व मिळाले. कामगाराला ये ‘गडी ऐवजी ‘माथाडी’ असे मानाचे संबोधन प्राप्त झाले. काही वर्षातच अण्णासाहेबांनी पाठपुरावा करून माथाडींसाठी 1969 साली महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र माथाडी, हमला व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम हा ऐतिहासिक कायदा संमत करून घेतला. हा कायदा आणण्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई, नरेंद्रजी तिडके, शरद पवार या सारख्या दिग्गज नेत्यांची साथ लाभली. माथाडींसाठी सुरू केलेल्या लढयात स्व. काशिनाथ वळवईकर तसेच शेलार मामांची साथ मोलाची ठरली. यशवंतराव भाऊसाहेब शिंदे, सोपानराव देशमुख, जयवंतराव शिंदे, रामभाऊ सावंत, राघो धोंडू सणस, दादू पैलवान, धर्मु बापू आहिरे, शंकरराव महाडीक, विठ्ठल लक्ष्मण वाडकर, हरिभाऊ वाडकर, अण्णा जुनघरे, भिकू वाडकर, सखाराम देशमुख, सोपानराव देशमुख, आनंदराव गोळे, विठ्ठलराव शिर्के, साहेबराव शेलार, हरिश्चंद्र रामिष्टे, रघू विठोबा पोपले, भिकोबा राजिवडे, भगवान शिंदे, ज्ञानू मस्कर, दगडू कृष्णा पाटील, लक्ष्मण जवळ, बाळू लावंड, मणिराम शर्मा, पूरनसिंग राजपूत, किसनचंद शर्मा, कस्तुरीलाल शर्मा यासारख्या खंबीर कार्यकर्त्यांच्या साथीने अण्णासाहेबांचे मनोबल वाढले.
कामगारांसाठी अनेक वेळा अण्णासाहेबांनी संपाचे हत्यार यशस्वीरित्या उपसले आणि अनेक मागण्या पदरी पाडून घेतल्या. या सर्वांमध्ये लोखंडबाजार, खोका कामगारांचा आणि ट्रान्सपोर्ट कामगारांसाठी केलेला संप लक्षणीय ठरला. खोका कामगारांसाठी केलेल्या संपात तर संतप्त कामगारांनी भायखळा पोलिस स्टेशनच जाळल्याचे कामगार सांगतात. ट्रान्सपोर्टच्या संपात पनवेलपर्यंत गाड्या अडविण्यात आल्या होत्या, अनेक गाड्यांची तोडफोड झाली होती. संप मिटविण्याकरिता दिग्गज नेत्यांना मध्यस्थी करावी लागती होती. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे । परि तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे’ अशी खूणगाठ मनाशी बाळगलेल्या अण्णासाहेबांची कारर्कीद झंझावाता सारखी सुरू होती. कालांतराने अण्णासाहेबांच्या संकल्पनेतूनच कामगारांच्या आर्थिक नियोजन व बचतीसाठी माथाडी कामगार सहकारी पतपेढीची स्थापना करण्यात आली. ग्राहक सोसायटीची सुविधा सुरू केली. आरोग्यासाठी माथाडी शुश्रूषागृह स्थापन करण्यात आले. माथाडींना हक्काची घरे मिळवून देण्यात आली.
अणासाहेबांचा हा कामगार बहुतांश मराठा समाजातून आलेला. कामगारांची आर्थिक परिस्थिती, नोकर्यांची स्थिती नाजूक होती. त्यांना समाजात उभे राहण्यासाठी आरक्षणाची गरज होती. हे ओळखून कोणतेही राजकारण न करता सर्व मराठा बांधवांना ‘मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ या उक्तीप्रमाणे एकत्रित केले आणि मराठा महासंघाची स्थापना केली. 1980 सालीच अण्णसाहेबांनी मराठ्यांसाठी आरक्षणाची मागणी केली आणि मराठा आंदोलनाची मुहुर्तमेढ रोवली गेली. त्यांनी महाराष्ट्रभर अनेक झंझावती दौरे काढले. 22 मार्च 1982 साली मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून लाखो मराठा बांधव त्यावेळी जमा झाले. अण्णासाहेबांनी सरकार समोर मागण्या मांडल्या. बाबासाहेब भोसले हे त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यांनी अण्णासाहेबांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. ही गोष्ट मनाला लागल्याने त्यांनी 23 मार्च 1983 रोजी स्वत:च्या पिस्तुलातून गोळी झाडून मराठा समाजासाठी बलिदान दिले. एक झंझावात संपला, पण त्यांच्या लढयाची नोंद इतिहास कायमस्वरूपी घेत राहील.
प्रदीप भोसल
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai