Breaking News
यंदाचा पाऊसकाळ सुरू झाला असून सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. मात्र सध्या पाऊसही लहरीपणा दाखवत असल्याचे गेल्या काही वर्षांच्या अनुभवातून सिद्ध झाले आहे. म्हणूनच पडणाऱ्या प्रत्येक थेंबाची साठवण आणि साठवलेल्या जलाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तरच कमी-अधिक प्रमाणात पडला तरी आपल्या वाढत्या गरजा पूर्ण करु शकेल, इतका जलसाठा गाठीशी राहील.
यंदाचा उन्हाळा प्रचंड कडक होता. खरे तर अलिकडे हे वाक्य दर वर्षीच अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळते. ग्लोबल वॉर्मिंगचा सार्वत्रिक परिणाम आणि प्रभाव या वाक्यातून समोर येतो. त्यातच यंदा दिल्लीतील एका भागामध्ये तापमानाने 52 अंश सेल्सियसच्या पुढे मजल मारल्यामुळे याचे गांभीर्य पराकोटीचे वाढल्याचे जाणवत आहे. मात्र अखेर ही रखरख थांबून आता मान्सून अवतरला आहे. यंदाचा पाऊसकाळ समाधानकारक असल्याचे भाकीत वर्तवले गेले आहे. साधारणपणे या संपूर्ण हंगामात 105 टक्के पाऊस पडेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच पाऊस हवा तेवढा आणि हवा तेव्हा पडेल आणि शेतकऱ्यांना समाधानकारक परिणाम बघायला मिळतील, या अपेक्षेनेच आगामी पर्जन्यकाळाकडे पाहू या.
अर्थात अलिकडे पाऊसही भरवशाचा राहिलेला नाही. गेल्या काही वर्षांचा अंदाज तर त्याचा लहरीपणाच दाखवून देतो. त्यातच कमी कालावधीमध्ये पडणारा प्रचंड पाऊस ही अलिकडची मोठी समस्या ठरत आहे. असा अतिरेकी पाऊस पाणवठ्यांमधील जलसाठा वाढवत नाहीच पण दुसरीकडे त्याच्या प्रभावामुळे जमिनींमध्ये अतिरिक्त पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होते. म्हणजेच कुठे अतिवृष्टी तर कुठे अत्यल्प पाऊस; कुठे पाणी तुंबण्याचे प्रकार तर कुठे दरडी कोसळून होणारे नुकसान; कुठे प्रचंड पावसात जुन्या इमारती कोसळल्याने होणारी जीवित आणि वित्त हानी तर कुठे रेल्वे-लोकल यंत्रणा पाण्याखाली गेल्यामुळे होणारी प्रवाशांची फरफट अशी एक ना अनेक प्रकारची संकटे या काळालाही चिंताग्रस्त अवस्थेत ठेवतात. कोणतीही पूर्वसूचना न देताना धरणांमधील पाणी सोडल्यामुळे, नद्या-ओढ्यांना पूर आल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरुन होणारे नुकसान, त्यामुळे गुराढोरांच्या जीविताला असणारा धोकाही अशा संकटांचे गांभीर्य वाढवून जातो. बघता बघता गावे ढिगाऱ्याखाली दबण्याच्या वाढत्या घटनाही मन हेलावून टाकणाऱ्या ठरतात. पावसाचा अथवा पर्जन्यकाळाचा हाच बदलता आणि काहीसा धास्तावणारा ट्रेंड लक्षात घेता सुरूवातीपासून नियोजनाची गरज लक्षात घेणे गरजेचे आहे. पाऊस स्थिरावेपर्यंत आपली चोख तयारी झाली तर आपण या काळात होऊ शकणारे सर्व प्रकारचे नुकसान टाळू शकू. अन्यथा मागच्या पानावरुन पुढे... अशाच स्वरुपात हा हंगामही मागे पडेल.
पावसावर सगळ्यांच्या अपेक्षा केंद्रित असतात. त्यातील एक म्हणजे पावसामुळे दुष्काळ संपेल, अशी आशा असते. खरे तर दुष्काळाचे खापर निसर्गावर फोडण्यात काहीच अर्थ नाही. पाऊस कमी पडला म्हणून दुष्काळ पडला, असे समजणेच चुकीचे आहे. हे बाळबोध विचार आहेत असे म्हणावे लागेल. याचे कारण सरासरीपेक्ष्ाा कमी पाऊस झाला तरी तो आपली गरज भागावी इतका नक्कीच असतो. किंबहुना, तो गरजेच्या तिप्पट पडतो. हे ऐकून आश्चर्य वाटले असले तरी ते सत्य आहे. त्यामुळे पाऊस कमी झाला म्हणून दुष्काळ आला असे म्हणण्यात अर्थ नाही.गरज आहे ती उपलब्ध पाण्याच्या काटेकोर वापराची. उदाहरणार्थ, एखाद्या गावाचे क्ष्ोत्रफळ 2000 हेक्टर इतके असेल आणि तेथे दर वर्षी 500 मिली म्हणजे अर्धा मीटर पाऊस पडला तरी त्यातून दहा लाख टँकर्सना पुरेल इतके पाणी उपलब्ध होते. विशेष म्हणजे हे शुध्द, डिस्टिल्ड वॉटर असते. या पाण्याचा वापर 365 दिवस 24 तास करता येणे सहज शक्य आहे. अर्थातच त्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर आणि त्याची योग्य साठवणूक या बाबी गरजेच्या ठरतात. सध्या आपण याच बाबीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
दर वर्षी साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत किती पाऊस पडणार याचे अनुमान काढले जाते. त्यात उणे-अधिक झाले तरी सप्टेंबरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा ठेवल्यास दुष्काळी स्थिती निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता विज्ञान बरेच पुढे गेले आहे. त्याच्या सहाय्याने पाणी साठवण तसेच वापरासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करता येणे शक्य आहे. उदाहरण द्यायचे तर तळी तयार करून, प्लास्टिक अंथरून पाणी साठवणे शक्य आहे. म्हणजेच एखादे वर्षी पाऊस पडला नाही तरी फारसे बिघडणार नाही असे आदर्श आणि आश्वासक चित्र निर्माण व्हायला हवे. ते अशक्य नाही. परंतु ते प्रत्यक्षात येण्यासाठी गरज आहे ती जलसाक्ष्ारतेची. आपल्याकडे पाणीसाठवण आणि पाणी वापराबद्दल बरेच गैरसमज आहेत. जलनिरक्ष्ारतेचा कळस ठरावा अशी स्थितीही काही ठिकाणी पहायला मिळते. त्यात सुधारणा करायची तर एक लिटर पाणी म्हणजे किती, क्युसेक्स म्हणजे काय या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला हवीत. त्याचबरोबर कोणत्या गोष्टीसाठी किती पाणी लागते याचे गणित लक्ष्ाात घेणेही आवश्यक आहे.
कोणतीही गरज भागवायला प्रचंड पाणी लागते. विजेचा विचार करायचा तर एक युनिट वीजेसाठी चार हजार लिटर पाणी वापरले जाते. एक लिटर पेट्रोलसाठी 50 हजार लिटर पाणी वापरले जाते. ते कसे हे सहज लक्ष्ाात येणार नाही. आपण कच्च्या तेलाची आयात करतो, त्यासाठी संबंधित देशाकडे मांस पाठवावे लागते. आपल्या देशातून दीड किलो बीफ पाठवले जाते तेव्हा त्यातून एक लिटर पेट्रोल येते. हे दीड किलो बीफ तयार करण्यासाठी 50 टन पाणी लागते. अशा तऱ्हेने काही कोटी टन बीफची निर्यात केली गेली तेव्हा त्या माध्यमातून किती पाणी वापरले गेले याचा अंदाज बांधता येतो. एक किलो साखर तयार करण्यासाठी चार हजार लिटर पाणी लागते. आजच्या विकासनितीमुळे पाणी शेतातून शहराकडे वाहत आहे, ही बाबही लक्ष्ाात घेण्याची आवश्यकता आहे.
राज्यात उसाच्या लागवडीखालील क्ष्ोत्र वाढत असून या पिकाला सर्वाधिक पाणी लागते. त्यामुळे उसाच्या लागवडीवर निर्बंध आणावेत, असा विचार वारंवार बोलून दाखवला जात आहे. तेही एक प्रकारचे अज्ञानच म्हणायला हवे. ऊस बागायतदार स्वत: शेतातील उसापासून तयार होणारी सर्व साखर खात नाही किंवा ऊसही खात नाही. ऊस गाळपासाठी कारखान्यांकडे पाठवला जातो. उसासाठी वापरलेले पाणीही बाहेर जाते. त्याचा वापर संबंधित ऊस उत्पादकांकडून होत नाही हे लक्ष्ाात घ्यायला हवे. यावरून पाण्याचा अधिक वापर होतो म्हणून उसाच्या लागवडीवर निर्बंध आणावेत असे म्हणणे उचित ठरत नाही. विशेष म्हणजे शहरातील दरडोई पाण्याचा वापर हा ऊस बागायतदारापेक्ष्ाा अधिक आहे. या साऱ्या बाबींवरून ‘व्हर्च्युअल कंटेंट ऑफ वॉटर'चे महत्त्व लक्ष्ाात येते. यामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी किती पाण्याचा वापर करता याचा अभ्यास केला जातो. त्यावरून ‘वॉटर फूट प्रिंट' काढता येते. एक किलो तांदळाचे उत्पादन घेण्यासाठी अकरा हजार लिटर पाणी लागते तर एक लिटर दुधासाठी दहा हजार लिटर पाण्याची आवश्यकता असते.अशा पध्दतीने प्रत्येक गोष्टीचा गणित मांडून विचार केला जायला हवा.
पाण्याचा एकूण वापर आणि प्रत्यक्ष्ाातील उपलब्धता याचेही गणित गरजेचे ठरते. साधारणपणे पाण्याचा वापर चार कोटी घनमीटर इतका असतो. त्यामुळेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर आवश्यक ठरतो. आकाशातून पडणाऱ्या पाण्याला ‘ग्रीन वॉटर' म्हणतात. कॅनॉलमधून येणाऱ्या पाण्यालाही ‘ग्रीन वॉटर' असे संबोधले जाते. उन्हाळ्यात पाणी पातळी खाली जातेे आणि त्यात जागोजागचे घाण पाणी मिसळत असते. म्हणून मग या पाण्याला ‘ब्लॅक वॉटर' म्हणतात. एखाद्या जिल्ह्यात पावसाद्वारे एक कोटी घनमीटर पाणी पडले आणि ग्रे वॉटर व ब्लॅक वॉटर मिळून एक कोटी घनमीटर पाणी उपलब्ध झाले तर एकुणात बऱ्यापैकी पाण्याची तूट जाणवते. ती गृहित धरून पाणीवापराचे नियोजन व्हायला हवे.
आपल्याकडे अनेक जिल्हे परंपरागत दुष्काळी म्हणून ओळखले जातात. मात्र काही गावांनी दुष्काळी स्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी हजारो बोअरवेल्स घेतल्या आहेत. त्याद्वारे कधीही काढले न गेलेले भूस्तरातील पाणी काढल्यास त्याच्या आधारे शेतीक्ष्ोत्रात विविध पिकांचे उत्पादन घेणे शक्य होईल. हे उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठेत जाईल. साहजिक तेथील पाणीही बाजारपेठेकडे नेता येईल. याच पध्दतीने पाण्याची निर्यात वाढवणे शक्य होईल. मुख्य म्हणजे ही सारी माहिती जल साक्ष्ारतेच्या माध्यमातून सामान्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. ती लक्ष्ाात घेऊनच पाणी वापराचे नियोजन झाले तर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. अन्यथा, चेरापुंजीसारखा पाऊस सर्वत्र कोसळला तरी दुष्काळाचे चित्र समोर येत राहणार आहे. तसे ते येऊ द्यायचे का, याबाबत विचार करणे ही काळाची गरज आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai