Breaking News
भारताचे निवडणूक आयुक्त श्रीमान टी. एन. शेषन यांनी निवडणूक आयोगाला प्राप्त स्वायत्तता दर्जा व त्याच्या माध्यमातून प्राप्त अधिकाराचा वापर करून निवडणूक प्रक्रियेत सुधारणा केल्याने बऱ्यापैकी निवडणूक प्रक्रियेत सुधारणा झालेल्या आहेत आणि त्याचे सकारात्मक परिणाम दृश्य स्वरूपात संपूर्ण भारतीयांना दिसत आहेत . खेदाची गोष्ट हि आहे की त्यांच्या पश्चात कालसुसंगत सुधारणांमध्ये खंड पडल्याने स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर देखील “ घटनेला, संविधानाला अभिप्रेत लोकशाहीची स्वप्नपुर्ती “ दृष्टिक्षेपात आलेली नाही.
“लोकशाही यंत्रणांतील कारभाराची माहिती” हा घटनेने नागरिकांना दिलेला मूलभूत संविधानिक हक्क आहे . असे असले तरी स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतर देखील नागरिकांना अगदी ग्रामपंचायतीचा कारभाराची देखील माहिती मिळत नाही . महापालिका, राज्य सरकारच्या यंत्रणा केंद्र सरकारच्या यंत्रणा यांच्या कारभाराची माहिती हि तर अगदी दूरची गोष्ट !
राज्य निवडणूक आयोग नागरिकांना निवडणुकीत मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी सातत्याने विविध माध्यमातून आवाहन करत असते व नागरिक त्यास सकारात्मक प्रतिसाद देत उत्साहाने मतदान करत असतात.
निवडणूक आयोगाला नागरिकांचा प्रश्न आहे की , केवळ निवडणुकीतील मतदान हाच बळकट लोकशाहीचा एकमेव निकष आहे का ? ग्रामपंचायत सदस्यापासून ते आमदार -खासदार पदासाठी 'पात्र ' व्यक्तीची निवड करणे हे बाब देखील लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे . मतदारांना सुयोग्य -पात्र व्यक्तीची निवड त्या त्या पदासाठी करण्यासाठी त्या त्या व्यक्तीचा शैक्षणिक -राजकीय -आर्थिक -सामाजिक पूर्वइतिहास मतदारांना कळणे आवश्यक असतो.
परंतू प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की जी व्यक्ती गेली 5 वर्षे आमदार -खासदार म्हणून कार्यरत होती त्या व्यक्तीने खर्च केलेल्या 'आमदार /खासदार ' निधीचा लेखाजोखा देखील मतदारांसाठी उपलब्ध नसतो . हि कुठली लोकशाही व्यवस्था ? स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढा देणाऱ्यांना 'अशी लोकशाही ' अभिप्रेत होती का ? गल्ली पासून दिल्ली पर्यंत “पारदर्शक कारभाराच्या दवंड्या “ पिटल्या जात असताना मतदारांना लोकशाही यंत्रणांच्या कारभारापासून वंचित का ठेवले जाते ? का ग्रामपंचायती पासून ते राज्य -केंद्र सरकारच्या प्रत्येक यंत्रणांच्या प्रत्येक निर्णयाची , पै ना पै खर्चाचा लेखाजोखा पब्लिक डोमेनवर खुला केला जात नाही ? गुप्त कारभार पद्धती हीच भ्रष्टाचाराची जननी आहे हे सर्वज्ञात असताना सर्वच यंत्रणांचा कारभार गुप्त ठेऊन लोकशाहीची का प्रतारणा केली जाते आहे ?
गेली अनेक दशके हा प्रश्न अनुत्तरित आहे की , जो निवडणूक आयोग लोकशाहीच्या बळकटी करणासाठी निवडणुकीत मतदान करा असे मतदारांना आवाहन करते तोच राज्य व निवडणूक आयोग “ लोकशाहीतील यंत्रणांचा कारभार पारदर्शक करून “ लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट करण्यासाठी पाऊले का उचलत नाही ?
निवडणूक आयोगाने सर्व आमदार -खासदारांना आपल्या 5 वर्षाचा लेखाजोखा पब्लिक डोमेनवर उपलब्ध करण्याचा नियम अनिवार्य केला तर त्याला नकार देण्याचे धाडस कोणताच राजकीय नेता व कोणताच राजकीय पक्ष करू शकत नाही कारण ते स्वतःला सर्वेसर्वा समजत असले तरी त्यांना हि गोष्ट ज्ञात आहे की 5 वर्षाने का होईना आपल्याला निवडणुकीच्या वेळेस जनतेला सामोरे जाण्याशिवाय अन्य पर्याय असत नाही.
काही प्रमुख मागण्या
अगदी केजीच्या विद्यार्थ्यांची देखील वर्षभरानंतर त्याने वर्षभरात केलेल्या अभ्यासाचे परीक्षण केले जाते, त्याचे उत्तरदायित्व फिक्स असते परंतू लोकशाहीचा गाडा हाकणाऱ्या लोकप्रतिनिधींचे उत्तरदायित्व फिक्स करणारी , परीक्षण करणारी कोणतीच पद्धत ,यंत्रणा भारतीय लोकशाहीत अस्तित्वात नाही. लोकप्रतिनिधींना उत्तरदायी बनवण्यासाठी विद्यमान आमदार-खासदारांना पुन्हा निवडणुकीला उभे राहताना त्यांनी 5 वर्षात केलेल्या कामाचे मूल्यांकन करणारे प्रगतीपुस्तक पब्लिक डोमेनवर उपलब्ध करून देणे अनिवार्य करावे.
लोकप्रतिनिधींना जनतेप्रती उत्तरदायी करण्यासाठी नगरसेवक निधी, आमदार निधी, खासदार निधी याचा लेखाजोखा कामाचे स्वरूप, कंत्रादाराचे नाव, केलेल्या खर्चाचा तपशील ई. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्याची पद्धत सुरु केली जावी.
भारतीय लोकशाही व्यवस्थेत निवडणुका लढवण्यासाठी शैक्षणिक अट, अनुभवाची अट नसल्याने निवडून आलेल्या व्यक्तीने त्या त्या पदाला योग्य न्याय द्यावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य ते खासदार या प्रत्येक पदासाठी 7 दिवस ते 3 महिन्यांचे प्रशिक्षण पद्धत कार्यान्वित करून सदरील परीक्षण अनिवार्य करावे व ते पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थीची परीक्षा घेऊन पडताळणी करावी .
निवडणूकपूर्व जाहीरनामा, वचननामा, आश्वासने यांच्या पूर्ततेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया ब्लूप्रिंट सक्तीची करा - लोकशाही पद्धतीत निवडणुकीत प्रचार हा जनमताला दिशा देण्याचा सर्वोत्तम मार्ग असतो. परंतू गेल्या काही दशकांत प्रचारातील जाहीरनामे ,वचननामे हि दिशाभूल करणारे मार्ग ठरताना दिसतात. याचे प्रमुख कारण म्हणजे निवडणूक पूर्व काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या सक्ती बाबत वर्तमान व्यवस्थेत कोणतीच व्यवस्था नाही. निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांना जी आश्वासने दिली जात आहेत त्याच्या पूर्तता प्रक्रियेची ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर मांडणे सक्तीचे करावे .
सजग, जागृत नागरिक हाच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा प्रमुख स्तंभ असतो हि बाब लक्षात घेत “स्वायत्त निवडणूक आयोगाने “ लोकशाहीच्या उच्चीकरणासाठी , बळकटीकरणासाठी डिजिटल जनजागृती अभियान राबवावे . विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील लोकशाही बाबत तज्ञ्? असणाऱ्या व्यक्तींचे भाषण , प्रबोधन करणारे व्हिडीओ , कार्टून्स , शालेय अभ्यासक्रमात लोकशाही यंत्रणांची माहिती नागरीकाकांपर्यंत पोचवावी . लोकशाहीच्या दृष्टीने साक्षर नागरिक या साठी प्रयत्न करावेत.
- सुधीर दाणी, सजग नागरिक मंच, नवी मुंबई
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai