Breaking News
नवी मुंबई ः मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी भारतातील इतरही भाषा आल्या तर भाषांचा एक उत्सव होईल ही कल्पना करीत सुप्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव यांच्या संकल्पनेतून मराठी भाषा भगिनींचे संमेलन हा अभिनव उपक्रम खुल्या सुलेखन अक्षर प्रदर्शनाच्या निमित्ताने संपन्न झाला.
पालिकेच्या वतीने अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी यांच्या सहयोगाने 24 ते 28 फेब्रुवारी 2024 या कालावधीत वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक चौक या भागामध्ये ‘उत्सव मराठी भाषेचा' हे खुले सुलेखन प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांचा या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत असून सुलेखन प्रात्यक्षिकांचे उपक्रम आयोजित करुन यामध्ये सुलेखनकार प्रत्यक्ष सादरीकरण करीत आहेत. यामध्ये मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी मल्याळी, बंगाली, मोडी, जैनी अशा इतरही भाषा आल्या आहेत अशी संकल्पना सुलेखनाव्दारे मोठया कागदावर मांडत चौकातील वर्तुळाकार चौथऱ्याच्या मध्यभागी आकर्षक अक्षररचनेची वर्तुळाकार मराठी बाराखडी रेखाटत त्याच्या चारही बाजूस इतर भाषांमधील अक्षररचना चितारली. हे सुलेखन रेखाटन पाहण्यासाठी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. अक्षर सुलेखन झाल्यानंतर या अक्षरांनी व शब्दांनी प्रत्येकाचे आयुष्य उजळून निघते ही संकल्पना अधोरेखित करीत वर्तुळाकार चौथऱ्याच्या सर्व बाजूंनी दीप प्रज्वलित करण्यात आले. जणू काही आपापले अक्षरदीप उजळवित मराठी भाषा भगिनींनी म्हणजे बहिणींनी मराठी भाषेचा गौरव केला आहे. या उपक्रमात सुलेखनकार अच्युत पालव यांच्या मार्गदर्शनाखाली अनिता डोंगरे, तृप्ती माने फुरिया, हर्षदा साळगांवकर, श्रीकांत गवंडे, प्रसाद सुतार यांनी मराठीसह तिच्या भाषा भगिनींचे अक्षर सुलेखन केले. 28 फेब्रुवारीपर्यंत 24 तास विनामूल्य खुले राहणाऱ्या या सुलेखन प्रदर्शनाला मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी असे आवाहन केले.
27 फेब्रुवारी रोजीच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी यांच्या सहयोगाने 24 ते 28 फेब्रुवारी 2024 या कालावधीत वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक चौक या भागामध्ये आयोजित 'उत्सव मराठी भाषेचा' या खुल्या सुलेखन प्रदर्शनाच्या शुभारंभप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला. अच्युत पालव यांनी 'निश्चय केला, नंबर पहिला' हे महानगरपालिकेचे ध्येयवाक्य सुलेखनातून मोठ्या कागदावर रेखाटत मराठी राजभाषा गौरव दिनाच्या शुभेच्छाही सुलेखनातून सर्वांना दिल्या. या प्रदर्शनामध्ये सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्यासह श्रीकांत गवंडे, श्वेता राणे, अनिता डोंगरे, तेजस्विनी भावे, अमृता अमोदकर, तृप्ती माने फुरिया, हर्षदा साळगांवकर, यतिन करळकर, प्रसाद सुतार, मनिषा नायक, पूजा गायधनी, रूपाली ठोंबरे, निलेश गायधनी, रोहिणी निंबाळकर, रसिका कोरगांवकर, वैशाली अधिकारी यांनी सुलेखनातून कविता व मराठी साहित्यकृतींतील वाचनीय उतारे आकर्षक रितीने अक्षरालंकृत केलेले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai