Breaking News
एमएमआरडीए-सिडकोने विकास करण्याची नाईकांची मागणी
नवी मुंबई : नगरविकास विभागाने कल्याण लोकसभा मतदारसंघातील 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास आ. गणेश नाईक यांनी विरोध केला असून पायाभूत सुविधा पुरवल्यानंतर आणि तेथील अतिक्रमणांचे निष्कासन केल्यानंतर सदर गावे समाविष्ट करावीत अशी मागणी केली आहे. तेथील सुविधांचा कोट्यवधींच्या खर्चाचा भार नवी मुंबई महापालिकेवर नको अशी भुमिका घेतल्याने लवकरच शिंदे विरुद्ध नाईक असा संघर्ष राज्यात पाहायला मिळणार आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेच्यावेळी कल्याण लोकसभा मतदार संघातील 14 गावांचा समावेश 1991 साली पालिका क्षेत्रात करण्यात आला होता. या 14 गावांमध्ये त्यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेने बाळे येथे माता बाल रुग्णालय केंद्र, तलावांचे सुशोभिकरण व रस्त्यांची कोट्यावधी रुपयांची कामे केली होती. परंतु, स्थानिकांनी महापालिका क्षेत्रात समाविष्ट होण्यास विरोध केल्याने 2007 साली अधिसूचना काढून ही गावे नवी मुंबई महापालिका हद्दीतून वगळण्यात आली होती. या 14 गावांमध्ये अनियंत्रित विकास झाला असून शेकडोंनी अनधिकृत बांधकामे उभी राहली आहेत. त्याचबरोबर तेथे पायाभुत सेवासुविधांचीही वानवा आहे. गेली अनेक वर्ष ही गावे अन्य नियोजन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यास शासनाने अनेक प्रयत्न केले परंतु, त्यास अपयश आल्याने या गावांचा विकास अनियोजित पद्धतीने झाला आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात ही 14 गावे मोडत असल्याने या गावांचा समावेश नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करण्यात आल्याचे बोलले जाते. 14 गावांच्या नवी मुंबई महापालिका हद्दीतील समावेशास आपला विरोध असल्याची स्पष्ट भूमिका ऐरोलीतील भाजप आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मांडल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या नगरविकास विभागाने गेल्या आठवड्यात काढलेल्या एका आदेशानुसार या गावांच्या नियोजनाचे संपूर्ण अधिकार नवी मुंबई महापालिकेकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून हे अधिकार काढून घेताना महापालिकेस हे अधिकार दिले गेल्याने या ठिकाणी बांधकाम परवानग्या देणे, मुलभूत सेवा सुविधा देणे, विकास आराखडा तयार करण्याची महत्त्वाची कामे आता महापालिकेस करता येणार आहेत. या कामापोटी पालिकेला हजारो कोटी रुपये खर्च येणार असल्याने नवी मुंबईच्या करदात्यांवर तो अन्याय असेल अशी भुमिका नाईकांनी घेऊन या समावेशास विरोध केला आहे. नुकतीच नाईक यांनी आयुक्त शिंदे यांची भेट घेऊन या क्षेत्रात एक रुपया जरी खर्च केला तरी आपल्याशी गाठ आहे असा सज्जड दम अधिकाऱ्यांना दिला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai