Breaking News
नवी मुंबई : खारघर येथे होणाऱ्या 48 व्या अश्वमेध महायज्ञ निमित्त आयोजित भूमीपुजन समारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पर्यावरण आणि सामाजिक ऐक्याला धक्का लावणाऱ्या घटना घडत असताना अश्वमेध यज्ञच्या माध्यमातून समृध्दी, सद्भावना आणि मांगल्याची पुनर्स्थापना होण्याला मदत होईल, असे यावेळी राज्यपाल बैस यांनी सांगितले.
अखिल विश्व गायत्री परिवार, शांतीकुंज, हरिद्वार या संस्थेतर्फे 23 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत खारघर येथे 48 वा अश्वमेध महायज्ञ होणार आहे. यानिमित्त सदर भूमीपुजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, देव संस्कृती विश्व विद्यालयचे प्र-कुलगुरू चिन्मय पंड्या, अखिल विश्व गायत्री परिवारचे संचालक मनुभाई पटेल, उद्योजक डॉ निरंजन हिरानंदानी, राधिका मर्चंट तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
अश्वमेध यज्ञ केवळ धार्मिक अनुष्ठान नाही, तर त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक आणि आध्यात्मिक महत्व आहे. सर्व समाजाला एकत्र घेऊन यज्ञ करीत असल्यामुळे त्यातून मतभेद मिटून एकात्मतेची भावना वाढते, असे राज्यपाल बैस म्हणाले. जागतिक हवामान बदलांचे परिणाम तीव्र होत असून अलिकडच्या काळात राज्याने वारंवार दुष्काळ आणि पूरस्थिती अनुभवली आहे. त्यामुळे पर्यावरण आणि विकास यामध्ये यांचा समतोल साधण्याची आवश्यकता आहे, असेही राज्यपालांनी सांगितले. दरम्यान, विश्वकल्याणाच्या उद्देशाने अश्वमेध महायज्ञाचे आयोजन केल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी अखिल विश्व गायत्री परिवारचे अभिनंदन केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai