Breaking News
वर्षाला सिडकोला मिळणार 60 लाख रुपये
नवी मुंबई : कोव्हीड काळापासून बंद असलेल्या अर्बन हाटचे परिचलन खाजगी संस्थेद्वारे करण्याचा निर्णय सिडकोने घेतला होता. परंतु, केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने दिल्ली हाटच्या धतवर सीबीडी येथील अर्बन हाटचे परिचलन करण्याची तयारी सिडकोला दर्शवली आहे. सिडको संचालक मंडळाने सदर प्रस्तावास मंजुरी दिली असून लवकरच पुन्हा एकदा अर्बन हाटची दारे असंख्य हातमाग व हस्तकला कलाकारांसाठी खुली होणारआहेत.
सिडकोने हस्तकला व हातमाग व्यवसायाला चालना मिळावी म्हणून सीबीडी बेलापुर येथे 4.75 हेक्टर क्षेत्रावर केंद्र सरकारच्या व सिडकोच्या संयुक्त विद्यमाने अर्बन हाट प्रकल्प सुरु केला होता. यासाठी वस्त्रोद्योग विभागाने 2.10 कोटी तर सिडकोने 5.45 कोटी रुपये खर्च करुन सदर प्रकल्प 2008 मध्ये सीबीडीमध्ये कार्यान्वित केला होता. यामध्ये 244 चौ. फुटाची 50 दुकाने असून 300 प्रेक्षकांसाठी ॲम्पीथिएटर, प्रदर्शन हॉल, फुड प्लाझा आणि चार टॉयलेट ब्लॉक बांधण्यात आले होते. 2010 पासून येथे देशभरात निर्माण होणाऱ्या स्थानिक वस्तुंचे प्रदर्शन भरवण्यात येत होते. परंतु, कोव्हिडनंतर सदर अर्बन हाट बंद असून सिडकोला त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च आला आहे. त्यामुळे सिडकोने अर्बन हाटचे परिचलन खाजगी संस्थेद्वारे करण्याचा निर्णय घेतला.
28 जुलै 2024 रोजी केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या दिल्ली हाट हस्तकलाचे प्रादेशिक संचालक यांनी अर्बन हाटला भेट देवून त्याचे परिचलन करण्याचा प्रस्ताव सिडकोला दिला. यामध्ये त्यांनी सिडकोला प्रति दुकान प्रति दिन 500 रुपये भाडे आठ महिन्यांसाठी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्या प्रस्तावामुळे सिडकोला वार्षिक 60 लाख रुपये मिळणार आहेत. सिडकोला वीज, पाणी आणि साफसफाई या सुविधा पुरवाव्या लागणार आहेत. सदर प्रस्ताव सिडकोच्या संचालक मंडळाने 6 ऑगस्टच्या बैठकीत मंजुर केला असून संबंधित विभागाबरोबर करारपत्र करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. सिडकोने घेतलेल्या या निर्णयामुळे लवकरच अर्बन हाटचे द्वार खुले होणार असून देशातील हातमागावरील वस्तूंना प्रदर्शनाची संधी उपलब्ध होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस