Breaking News
पुढील 30 वर्षाचे नियोजन ; 1100 कोटींच्या खर्चास सिडकोची मंजुरी
नवी मुंबई ः सिडकोने पनवेल महापालिका क्षेत्रात पुढील 30 वर्षात होणारा विकास विचारात घेऊन खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यास प्रशासकीय मान्यता दिलीआहे. या कामाचे अंदाजपत्रक आयआयटी मुंबई व सल्लागार टंडन अँड असोसिएटस मार्फत बनवण्यात येणार आहे. हा प्रकल्प 24.88 हेक्टर जमिनीवर उभा राहणार असून त्याला सूमारे 1100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे भविष्यात सिडको, पनवेल महापालिका व एमआयडीसी क्षेत्रात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.
सिडको व पनवेल महापालिका त्यांच्या क्षेत्रात निर्माण होणारा कचरा हा सिडकोच्या चाळ या गावी असलेल्या क्षेपणभुमीवर नेऊन त्याची विल्हेवाट लावतात. चाळ येथील क्षेपणभुमीत सात सेल असून त्यापैकी तीन शास्त्रोक्त पद्धतीने भरण्यात आले असून उर्वरित सेल ही लवकरच भरणार असल्याने नवीन जागा शोधणे क्रमप्राप्त आहे. पनवेल महानगरपालिकेने क्षेपणभुमीसाठी लगतच्या खाजगी जमिनीवर आरक्षण टाकले असून ही 24.88 हेक्टर जमीन टीडीआरच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी उपलब्ध करुन देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यामुळे या जागेवर लवकरात लवकर अत्याधुनिक घनकचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी सिडकोने प्रस्ताव बनवून संचालक मंडळाची मंजुरी घेतलीआहे.
सिडकोने बनवलेल्या प्रस्तावात पुढील 30 वर्षात सिडको, पनवेल व आजुबाजुच्या क्षेत्रात निर्माण होणारा सूमारे 2500 टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 1500 टन वर प्रक्रिया करण्यात येऊन त्यामधील 300 टन बायोचार, 27 मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती तसेच 150 टन कचऱ्यातून खतनिर्मिती करण्याचे ठरवले आहे. यासाठी सिडको पनवेल महानगरपालिकेसोबत करार करणार असल्याचे प्रस्तावात नमुद आहे. या संपुर्ण प्रकल्पाला 1100 कोटी रुपये खर्च येणार असून वगकरण करणाऱ्या प्रकल्पास 210 कोटी, लिचेड प्रक्रिया प्लॅटसाठी 37 कोटी रुपये, 27 मेगावॅट क्षमतेच्ा वीज निर्मितीसाठी 575 कोटी, बायोचार निर्मितीसाठी 75 कोटी, खतनिर्मितीसाठी 42 कोटी तर गाळ सुकवण्यासाठी 45 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारण्यात येणार असून बांधकामाचा दोन वर्षाचा कालावधीसह पुढील 20 वर्षांसाठी खाजगी विकासकास चालवण्यास देण्यात येणार आहे. या प्रकल्पास महाराष्ट्र प्रदुषण मंडळाची मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया खाजगी सल्लागार टंडन अँड असोसिएटस मार्फत राबवण्यात येणार आहे. यासाठी लागणारा निधी केंद्र सरकारच्या वित्तीय मंत्रालयाच्या पायाभुत सेवासुविधांसाठी राखीव योजनांमधून उभारण्यात येणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस