Breaking News
इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांच्या हस्ते उद्घाटन
नवी मुंबई : भारतातील आघाडीच्या डिफेन्स इंजिनिअरिंग कंपन्यांपैकी एक असलेल्या पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडने नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचे उद्घाटन भारतीय अंतराळ व संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांच्या हस्ते झाले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मुंजाल शाह उपस्थित होते.
ही चाचणी सुविधा भारतातील अवकाश आणि संरक्षण क्षेत्रासाठी हायपरस्पेक्ट्रल आणि अन्य ऑफ्टिकल सिस्टीमच्या संशोधन व विकासासाठी सर्वात प्रगत केंद्र बनणार असून या प्रणालींचा उपयोग पृथ्वी निरीक्षण, ऑटोमोबाईल्स, अंतर्गत सुरक्षा, नेव्हिगेशन, टेलिकम्युनिकेशन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये होणार असल्याचे इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. एस सोमनाथ यावेळी म्हणाले. भविष्यातील व्यवसायासाठी हायपरस्पेक्ट्रल ऑफ्टिकल सिस्टीम महत्त्वपूर्ण मानल्या जातात. भविष्यात अवकाश तंत्रज्ञानाचा जागतिक बाजार पुढील दशकाच्या अखेरीस 1 ट्रिलियन पर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे सन 2030 पर्यंत जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेतील 10 टक्के हिस्सा भारताच्या अवकाश धोरणासाठी मिळवण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.
ऑप्टिकल सिस्टीमच्या विकासामध्ये स्वदेशी क्षमतांना प्रोत्साहन देणे ही भारताच्या अवकाश नेतृत्वाच्या प्रयत्नांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या प्रवासात आम्ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा अविभाज्य भाग बनू इच्छित असल्याचे पारस डिफेन्सचे व्यवस्थापकीय संचालक मुंजाल शाह यांनी सांगितले. आमच्या कंपनीने निर्माण केलेली ही सुविधा भारताच्या अंतराळ तंत्रज्ञान आणि संरक्षण अभियांत्रिकी क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढविण्यासाठी आमच्या उद्दिष्टांचा आणि क्षमतेचा पुरावा असल्याचे ते म्हणाले. भारतातील पहिले प्रगत ऑप्टिकल सिस्टीम पार्क उभारणे हे आमचे उद्दिष्ट असून ही नवी सुविधा त्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे मुंजाल शाह म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai