नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार...
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2024
- 588
पक्षांतर केलेल्यांना पुन्हा घेणार नाही - आ. मंदा म्हात्रे
नवी मुंबई ः 2014 मधली विधानसभेची निवडणुक खेळीमेळीच्या वातावरणात झाली. मात्र 2024 विधानसभा निवडणुक विरोधकांनी गुन्हेगारी स्वरूपात, दमदाटी करून, दहशत माजवून लढली. कसेही करुन बेलापूर ताब्यात घ्यायचं एवढंच त्यांनी ठरवले हेोते आणि त्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले. परंतु लोकांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला. नवी मुंबईतील गुंडशाही मी मोडून काढणार असा निर्धार आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच पक्षांतर केलेल्यांना पुन्हा पक्षातथारा नाही अशी भुमिकाही त्यांनी मांडली. त्यामुळे नवी मुंबईत आता भाईगिरी नाही तर ताईगिरी चालणार असे संकेत मिळत आहेत.
बेलापुर विधानसभा मतदार संघाच्या विजयी आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईकराचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि पुढील ध्येयधोरण, प्रकल्प, विकासकामे काय असतील याची माहिती देण्यासाठी गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी कशाप्रकारे त्रास दिला त्याचा पाढा वाचला. कितीही वादविवाद असतीस तरी गणेश नाईक यांनी कधी खालची पातळी गाठली नाही परंतु त्यांच्या मुलाने अतिशय घाणेरडे राजकारण केले. बेलापुर मतदारसंघात तणाव निर्माण करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असा आरोप यावेळी म्हात्रे यांनी केला. परंतू लोकांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला. मी माझ्याघराप्रमाणेच बेलापूरचा विकास केला आहे. यानंतरही रखडलेले प्रकल्प पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आणि नवी मुंबईतील गुंडशाही मी मोडून काढणार असा निर्धार म्हात्रे यांनी केला.
पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली. माझ्या कामाच्या जोरावर मी सलग तीनवेळा निवडून आले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्ष नवी मुंबईकरांचे प्रश्न सोडवून त्यांना सेवा-सुविधा कशा मिळतील त्यासाठी प्रयत्न करणार असून नवनवीन प्रकल्प अमंलात आणण्याचा मानस आ. मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला. मला मंत्रिपदाची हव्यास नाही कारण मी मंत्र्यापेक्षाही जास्त पटीने काम केले आहे आणि त्यामुळे अख्या महाराष्ट्रात मला मानणारा वर्ग आहे हाच माझ्यासाठी मंत्रिपदापेक्षाही मोठा सन्मान आहे. ज्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केले अशा आमदार व नगरसेवक यांना पुन्हा पक्षात न घेण्याची ठाम भुमिका बेलापुर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे आणि जिल्हाध्यक्ष रामचंद्रघरत यांनी घेतलीआहे. जे कार्यकर्ते, पदाधिकारी येण्यास ईच्छुक आहेत त्यांचे आम्ही स्वागतच करु.
14 गावांना ज्यांनी विरोध केला होता तो विरोध अचानक बंद का झाला? त्यासाठी कोणासोबत बैठका झाल्याआणि त्यात अशी काय चर्चा झाली ज्यामुळे विरोध मावळला असा प्रश्नही उपस्थित करुन मंदा म्हात्रे यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावला. आगामी नवी मुंबई पालिका निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे यावेळी म्हात्रे यांनी सांगितले.
- आगरी-कोळ्यांची संस्कृती दाखवणारे गाव
नवी मुंबईतील मुळ गावांचे गावपण जपण्यासाठी आणि येथील आगरी-कोळी लोकांची संस्कृती जतन करण्यासाठी येथेही एक प्रतिकात्मक गाव बनवण्याचे स्वप्न आहे. आज अठरापगड जाती नवी मुंबईत गुण्यागोविदांनी नांदत असले तरी येथीलभुमिपुत्रांची आगरी कोळी लोकांची परंपरा, जीवनशैली सगळ्यांना कळावी यासाठी हा प्रकल्प करण्याचा उद्देश आहे. - भाजपचे सदस्य नोंदणी अभियान
भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईमध्ये सदस्य नाव नोंदणी अभियान सुरु केले आहे. 1 लाख सदस्य बनवण्याचे ध्येय पक्षाने ठेवले आहे. यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. ज्यांना संघटनेत सहभागी व्हायचे असेल तर 8800002024 क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केले आहे.
आगामी प्रकल्प
- कचऱ्यापासून वीज बनवणे
- गृहनिर्माण सोसायटीने सोलर बसवले तर मालमत्ता करात सूट देण्याचा प्रयत्न पालिकेच्या मदतीने करु
- सर्व समाजांसाठी दफनभूमी किंवा स्मशानभुमी बांधण्याचा मानस
- गावठाणाला मूळ स्वरूप देऊन घरे कायम करणार
- झोपडपट्टी पुनर्विकास हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी सुरु असलेली नावनोंदणी विरोधकांनी बंद केली ती पुन्हा सुरू करणार
- सामान्य नागरिकांसाठी, पालिका कर्मचारी, पत्रकार, गरीब ग्रामस्थांसाठी स्वस्तात घरे मिळण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा करणार
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai