Breaking News
लोकनेते दि.बा.पाटील यांच्या जयंतीदिनी आयोजन; 100 पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग
नवी मुंबई ः लोकनेते दि.बा.पाटील यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 13 जानेवारी 2024 रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष कृती समिती यांच्या सहयोगाने तसेच माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या माध्यमातून हा महारोजगार मेळावा पार पडणार आहे. अशी माहिती बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी दिली.
महारोजगार मेळावा आणि रोजगार व स्वयंरोजगार, उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त आणि सर्व स्थानिक नवी मुंबईकरांसाठी करण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने निर्माण होत असलेल्या रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकता विकासाच्या संधींची माहिती देण्यासाठी हा महारोजगार मेळावा भरवण्यात येणार आहे. केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, आमदार गणेश नाईक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक व अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या महारोजगार मेळाव्यामध्ये फॅसिलिटी मॅनेजमेंट, फिनान्स, इन्शुरन्स, सिक्युरिटी, उत्पादन, टयुटोरियल्स, इंजिनिअरिंग, फूड, रिटेल, कम्प्युटर हार्डवेअर ऍन्ड नेटवर्कींग, हॉस्पिटल्स, सेल्स ऍन्ड मार्केटींग, हॉटेल इंडस्ट्री इत्यादी क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. 13 जानेवारी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत हा मेळावा असणार आहे. मेळाव्यात ज्यांना नोकऱ्या मिळणार आहेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. या विनामूल्य महारोजगार मेळाव्याचा लाभ तरुण आणि तरुणींनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला माजी महापौर जयवंत सुतार, जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा माधुरी सुतार, माजी स्थायी समिती सभापती डॉक्टर जयाजी नाथ, स्थायी समितीचे माजी सभापती नवीन गवते, माजी नगरसेवक प्रकाश मोरे, माजी नगरसेवक अशोक गुरखे, युवा नेते संकल्प नाईक, समाजसेवक विजय वाळुंज, प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे दीपक पाटील आणि मनोहर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी तशा प्रकारचे शिक्षण उमेदवारांनी घ्यावे. शिक्षण घेतल्यानंतर ज्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षण उपलब्ध केले जाईल. -डॉक्टर संजीव नाईक, आयोजक महारोजगार मेळावा
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai