Breaking News
सिडको व नवी मुंबई महापालिका उचलणार प्रत्येकी 50% खर्च
नवी मुंबई ः गेली 15 वर्षे प्रलंबित असलेल्या घणसोली-ऐरोली नोड्संना जोडणाऱ्या उड्डाणपुलाला शासकीय मान्यता मिळाली आहे. या उड्डाणपुलाचा प्रस्तावित खर्च 540 कोटी रुपये असून सिडको व महापालिका प्रत्येकी 50 टक्के खर्च उचलणार आहेत. उच्च न्यायालयाच्या मान्यतेनंतर या उड्डाणपुलाची निविदा प्रक्रिया राबविणार असल्याचे शहर अभियंता विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सिडकोने बेलापुर ते ऐरोली अशा 21.15 कि.मी लांबीचा पामबीच मार्ग बांधण्याचे काम 1990 साली हाती घेतले होते. त्यापैकी घणसोली ते ऐरोली पामबीच मार्गाचे काम 2008 साली सुरु केले परंतु, या मार्गातील खाडीपुलाचे काम शासनाच्या अनेक परवानग्या प्रलंबित असल्याने अपुर्ण राहिले होते. या उड्डाणपुलाचे काम रेंगाळल्याने नवी मुंबईकरांना पामबीच मार्गाचा पुर्णतः वापर करता येत नव्हता. त्याचा भार ठाणे-बेलापुर मार्गावर पडत असल्याने हा पुल लवकरात लवकर व्हावा अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे लावून धरली होती.
सदर उड्डाणपुलाला महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने तसेच राज्य पर्यावरण आघात मुल्यमापन कार्यकारणी समितीने नुकतीच परवानगी दिली आहे. त्याचबरोबर हा उड्डाणपुल फ्लेमिंगो संरक्षण क्षेत्रात येत असल्याने त्याला ठाणे क्रिक फ्लेमिंगो अभयारण्य समितीने परवानगी देवून मोठा अडथळा दुर केला आहे. शासनाच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणजेच इको सेन्सीटीव्ह झोन आणि वन विभागानेही या उड्डाणपुलाला हिरवा कंदील दाखवला आहे. महापालिकेने कांदळवनांच्या पुनर्रोपणासाठी तसेच 10 वर्ष देखभाल व संगोपनासाठी 94 लाख 65 हजार रुपये मुंबई कांदळवन संधारण घटक यांचेकडे जमा केले आहेत. कांदळवनाच्या पुनर्रोपणासाठी तसेच वनीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने डहाणु येथील सरावली गावातील शासनाच्या मालकीची 4 हेक्टर पर्यायी जमिन वनविभागास वळती करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. कांदळवन संरक्षण अधिनियमाच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी आवश्यक असून शुक्रवारी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.
नव्याने प्रस्तावित केलेल्या या उड्डाणपुलाची किंमत 540 कोटी असून सिडको व महापालिका त्याचा निम्मा भाग उचलणार आहे. सदर पुलाची लांबी 1.265 कि.मी. असून रुंदी 27.60 मी आहे. या पुलाला ऐरोली सेक्टर 10, डीएव्ही स्कुल येथून कटाई नाक्याकडे व मुलूंडकडे जाणाऱ्या रस्त्यास स्वतंत्र एलिव्हेटेड आर्म प्रस्तावित केल्याने पामबीच मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना थेट मुलुंड व कटाईनाका कडे जाता येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर या उड्डाणपुलाची निविदाप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले. या उड्डाणपुलामुळे सिडकोच्या भुखंडांना आता सोन्याचा भाव मिळेल असे बोलले जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai