Breaking News
नवी मुंबई ः लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदार संघातून महिन्यापुर्वीच नाव जाहीर झाल्याने राजन विचारेंनी संपुर्ण मतदारसंघात प्रचाराची एक फेरी पुर्ण केली आहे. याउलट नरेश म्हस्के यांचे नाव आयत्यावेळी जाहीर झाल्याने म्हणावा तसा प्रभाव मतदारांवर पडत नसल्याचे दिसत आहे. विचारेंसाठी उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबईत घेतलेल्या प्रचारसभेला मोठा प्रतिसाद लाभल्याने विचारेंचा विजय नक्की मानला जात आहे. तर म्हस्केंची भिस्त केवळ मोदींच्या गॅरेंटीवर अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीतील घटक पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजपने संजीव नाईक यांची उमेदवारी निश्चित करुन त्यांना प्रचार करण्यास सांगितल्याने त्यांनी विचारे यांच्या तोडीस तोड जनसंपर्क सुरु केला होता. 2009 ते 2014 या कालावधीत ते या मतदारसंघातील खासदार असल्याने त्यांना मतदारसंघाची खडान्खडा माहिती होती. त्याचबरोबर नवी मुंबई हे त्यांचे कार्यक्षत्र असल्याने विचारेंना तेच टक्कर देवू शकतील असा होरा भाजपचा होता. परंतु, शिंदे यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केल्याने अखेर भाजपने एक पाऊल मागे घेतले आणि शिंदेंनी नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर केली.
म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याचे तीव्र नकारात्मक पडसाद नवी मुंबई भाजपात उमटले असून नाईक गटाने आपले राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवले. त्याचबरोबर ठाण्यातूनही म्हस्के यांना शिंदे सेनेतून एका गटाने विरोध केला असून त्याचाही फटका म्हस्के यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिरा-भाईंदर मधून म्हस्के यांना फारसा प्रतिसाद मिळेल अशी आशा भाजपला नाही. याची जाणिव फडणवीस यांना झाल्याने त्यांनी नाईकांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नेत्यांची नाराजी जरी दूर झाली असली तरी कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका नवी मुंबईतून म्हस्के यांना बसेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ठाकरे यांनी ठाणे लोकसभा मतदार संघातील विजय नक्की मानला असला तरी त्यांनी याबाबत कमालीची तयारी केली आहे. ऐरोली येथे मोठी सभा घेऊन शिंदेंविरुद्ध हुंकार भरला असून अजून एक सभा शिंदे यांच्या ठाण्यात घेणार असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही मनापासून विचारे यांचा प्रचार नवी मुंबईत करताना दिसत आहेत. याउलट महायुतीच्या प्रचारात कोणताही उत्साह दिसत नाही. आता म्हस्के यांची गॅरेंटी मोदी यांच्या करिष्म्यावरच अवलंबून आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai