Breaking News
नवी मुंबई ः नवी मुंबईत अनेक गृहनिर्माण सोसायटींनी पुनर्विकासाच्या माध्यमातून विकासाचा मार्ग चोखाळला आहे. वाशी से-6, भूखंड क्रं-3 येथील बी टाईप अपार्टमेंटचा पुनर्विकास सी-व्युव्ह सहकारी गृहनिर्माण संस्था या नावाने करण्यात येत असून विकासकांकडून रहिवाशांना कायमस्वरूपी पर्यायी निवास कराराचे वाटप रविवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आले. रहिवाशांनी याबाबत विकासकासह ही योजना मंजुर करणाऱ्या पालिकेला धन्यवाद दिले आहेत.
सिडकोने 30 वर्षापुर्वी बांधलेल्या इमारती वेळेपुर्वीच धोकादायक ठरल्याने पुनर्विकासाची मागणी गेली अनेकवर्ष स्थानिकांकडून होत होती. परंतु, शासन देत असलेल्या अतिरिक्त चटईक्षेत्रात पुनर्विकास शक्य नसल्याने विकासकांनी त्याकडे पाठ फिरवली होती. परंतु, फडणवीस सरकारने याबाबत सकारात्मक भुमिका घेत पुनर्विकासासाठी 3 चटईक्षेत्रासह 60 टक्के अतिरिक्त चटईक्षेत्र मंजुर केल्याने नवी मुंबईत धोकादायक घरांचा पुनर्विकास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाशी सेक्टर 6, भुखंड क्र. 3 येथील बी टाईप अपार्टमेंटमधील 288 सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास द गेट वे चे आणि साई डेव्हलपर्सचे पार्टनर नलिन शर्मा यांच्यावतीने करण्यात येत आहे. त्यासाठी नव्याने सीव्युव्ह सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना करण्यात आली असून या प्रकल्पाचे बांधकाम विकासकाने हाती घेतले आहे. त्याचबरोबर विकासकाने सभासदांना कायमस्वरूपी पर्यायी निवास कराराचे वाटप नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केल्याने लाभार्थ्यांनी विकासकांचे आभार मानले. कायस्वरूपी पर्याय निवास करार महारेरा कायद्यांनुसार विकासकांसाठी बंधनकारक आहे. यावेळी विकासक नलिन शर्मा, अभिषेक शर्मा यांच्यासह सोसायटीचे सर्व सभासद उपस्थित होते. सप्टेंबर 2025 पर्यंत घराचा ताबा देण्याचा निर्धार यावेळी विकासक नलिन शर्मा यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईत प्रथमच सहा महिन्यात कायमस्वरूपी निवास कराराचे वाटप झाले आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत रहिवाशांना घराचा ताबा देण्याचा आमचा प्रयत्न असून त्यानुसार प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. रहिवाशांनी दाखवलेला विश्वास आणि सहकार्यामुळेच प्रकल्प वेळेत पुर्ण होईल अशी आशा आहे. - नलिन शर्मा, विकासक
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai