Breaking News
संदीप नाईक, अशोक गावडे, विजय नाहटा व चौगुले यांच्या बंडखोरीने वाढली चुरस
नवी मुंबई ः नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर मतदार संघात भाजप सहज विजयी होईल असे मानले जात होते. परंतु, भाजप नेते संदीप नाईक यांनी तुतारी हातात घेतली तर चौगुलेंनी ऐरोली मतदार संघात बंडखोरी करुन नाईकांपुढे तगडे आव्हान उभे केले. त्याशिवाय बेलापुरमधून अशोक गावडे व विजय नाहटा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दोन्ही मतदार संघातील लढत आता चुरशीची झाली आहे.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेलापुर मतदारसंघात भाजप जिल्हाप्रमुख संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवल्याने मंदाताई व संदीप नाईक यांच्यात थेट लढत होणार होती. परंतु, विजय नाहटा व अशोक गावडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने आता ही लढत चौरंगी होणार आहे. त्यातच मनसेचे गजानन काळे हेही या मतदारसंघात उभे असून मागील वेळी त्यांना 27 हजार मते मिळाली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी पंतप्रधान आवास घरांच्या किंमती कमी करणे, टोलमाफीस कंत्राटी कामगारांचे वेतन यासारखी प्रकरणे धसास लावल्याने यावेळी ते किती मते घेतात याकडे विरोधकांचे लक्ष आहे. नाहटा यांनीही गेले वर्षभर अनेक उपक्रम बेलापुर मतदारसंघात राबवून नवी मुंबईकरांच्या अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला आहे. गावडे यांच्या उभे राहण्याने म्हात्रे यांचे मताधिक्य घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, नाहटा यांना मात्र आपण बाजी मारु असे वाटत आहे. अशोक गावडे यांनी राष्ट्रवादीकडून लढताना मागच्या निवडणुकीत 47 हजार मते मिळवली होती. त्यांच्या उभे राहण्याने तुतारीकडील मते गावडे यांच्याकडे वळल्यास त्याचा फटका संदीप नाईक यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदार या चुरशीच्या लढाईत कसे मतदान करतो यावरच वरील दिग्गजांचे भवितव्य ठरणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai