Breaking News
माजी मंत्री गणेश नाईक व आ. मंदा म्हात्रे दोन्ही आशावादी
नवी मुंबई ः अनेक रुसव्या फुगव्यानंतर महायुतीचे सरकार जरी स्थापन झाले असले तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अद्यापपर्यंत खातेवाटप जाहीर केले नसल्याने अनेक तर्कविर्तकांना उधाण आले आहे. शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळात किती जागा मिळतात यावर त्यांच्या आमदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नवी मुंबईतील आमदाराची या मंत्रिमंडळात वर्णी लागते का याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी 11 डिसेंबरपर्यंत थांबण्याचा सल्ला दिल्याने सर्वांनी देव पाण्यात ठेवले आहेत. 7 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु होत असल्याने सरकारची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना पेलावी लागणार आहे. सध्या राज्यात लागलेल्या निवडणुकीच्या निकालावरुन व ईव्हीएम मशिनवरुन जोरदार चर्चा सुरु असून त्याचा आवाज या अधिवेशनात उठेल असे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यानंतर त्यांनी जरी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी त्यांच्या नाराजीला भाजप किती महत्व देते हे मंत्रिमंडळ विस्तारावरुन कळेल.
मंत्रिमंडळात नवी मुंबईतील एखाद्या आमदाराची वण लागावी अशी अपेक्षा नवी मुंबईकरांची आहे. गणेश नाईक यांनी ठाण्याचे पालकमंत्रीपद भुषवले असल्याने तसेच एकनाथ शिंदे यांना ते ठाण्यात चांगलीच टक्कर देतील त्याशिवाय भाजपची एकहाती सत्ता नवी मुंबई महापालिकेवर नाईक यांच्या नेतृत्वाखाली येऊ शकते यामुळे त्यांचे पारडे सध्या जड आहे. आ. मंदा म्हात्रे यांनी भाजपचे बंडखोर संदीप नाईक यांचा पराभव केला असल्याने तसेच त्यांची आमदारकीची ही तीसरी वेळ असल्याने त्यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी आशा म्हात्रे समर्थकांना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे नवी मुंबईत कोणत्या आमदाराची मंत्रिमंडळात वण लावतात याकडे समस्त नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai