Breaking News
नवी मुंबई ः सुदृढ आरोग्यासाठी जंतनाशक गोळी हि संजीवनी असून राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम वर्षातून दोन वेळा राबविण्यात येते.यंदा हि मोहीम नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दि. 4 डिसेंबर 2024 व मॉप अप दिन दि.10 डिसेंबर 2024 रोजी राबविण्यात येणार आहे. यामध्ये 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना वयोगटानुसार निश्चित केल्या प्रमाणे जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. शाळांमध्ये हजर असणाऱ्या मुला-मुलींना शिक्षकांद्वारे तसेच अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींना अंगणवाडी शिक्षकांद्वारे गोळी देण्यात येईल.
1 ते 19 वयोगटातील बालकांमध्ये आढळणाऱ्या आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हे आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहे. बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुला मुलीना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे,पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे आहे. जंताचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंत नाशक गोळी घेण्याबरोबरच हात स्वच्छ धुणे, शौचालयाचा वापर करणे, भाज्या व फळे स्वच्छ धुवून खाणे, नखे नियामित कापणे व स्वच्छ ठेवणे, बाहेर जाताना बूट अथवा चपलांचा वापर करणे ही खबरदारी घेणे ही आवश्यक आहे. ही मोहीम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे.
बालकाच्या शरीरामध्ये जंताचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होवू शकते. हे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये. सदर मोहिमेकरीता नवी मुंबई महानगरपालिकेचे 174983 उद्दिष्ट असून याकरिता सर्व नियोजन केले असून याअनुषंगाने आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व एकात्मिक बाल विकास विभाग यांच्या एकत्रित सभा घेऊन संबंधित सर्वांचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून अभियानाची जनजागृती करण्यासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. तरी आपल्या 1 ते 19 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना जंतनाशक गोळी देऊन कृमीदोषामुळे होणाऱ्या रक्तक्षय व कुपोषणापासून प्रतिबंध करून उत्तम आरोग्य ठेवणे व पोषण स्थिती आणि शिक्षणाचा दर्जा उंचावणे महत्त्वाचे आहे. असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai