Breaking News
सिडकोच्या सह-व्यवस्थापकीय संचालकांसोबत सकारात्मक चर्चा
नवी मुंबई : आमदार मंदा म्हात्रे यांनी 13 फेब्रुवारी रोजी सिडकोचे सह-व्यवस्थापकीय संचालक-3 गणेश देशमुख यांच्या समवेत विविध प्रश्नांवर बैठक घेतली. या बैठकीत प्रलंबित असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला.
नवी मुंबईमध्ये महत्वपूर्ण होत असलेल्या प्रकल्पा संदर्भात तसेच बेलापूर, सीवुडस, नेरुळ, जुईनगर, सानपाडा, तुर्भे, वाशी येथील विविध प्रश्नांवर चर्चा या बैठकीत करण्यात आली. महिला बाल भवनाची निविदा पूर्ण झाली असून उर्वरित प्रक्रिया करणे, नवी मुंबईतील सर्व धार्मिक स्थळांचे भूखंड धार्मिक स्थळांच्या दराप्रमाणे संस्थेच्या नावावर करणे आणि नवीन जे काही छोटे भूखंड आहेत ते धार्मिक स्थळांसाठी आरक्षित ठेवणे, फुलपाखरु उद्यान उभारण्यासाठी सारसोळे पामबीच लगतचा 12 एकर भूखंड नवी मुंबई महापालिकाकडे हस्तांतरीत करणे, करावे गांव आणि करावे नगर परिसरातील तसेच दारावे गावातील रहिवाशांकरिता समाज मंदिरासाठी भूखंड उपलब्ध करणे, करावे गांव येथे मासळी मार्केट करिता भूखंड उपलब्ध करणे, नेरुळ सेक्टर-50 ई अंतर्गत प्रभाग क्र.107 मध्ये ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र तसेच विविध सुविधा पुरविणे यासह असे अनेक विविध प्रश्नांबाबत सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांशी आ. मंदाताई म्हात्रे यांनी चर्चा केली.
दरम्यान, सदर सर्व प्रश्नांवर सिडकोचे सह-व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांनी सकारात्मकता दाखवत सदरचे प्रश्न लवकरात लवकर माग लावण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक दीपक पवार, समाजसेवक विकास सोरटे, मनोहर बाविस्कर, कमळ शर्मा, बलवीरसिंग चौधरी, अशोक नाईक, जयवंत तांडेल, विजय नाईक, तसेच प्रजापती मंदिर, सरस्वती धाम मंदिर, दुर्गा माता मंदिर, सेवालाल मंदिर, राम मंदिर, मंदिराचे विश्वस्त आणि सदस्य उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai