गृहिणींना मिरचीचा ठसका

नवी मुंबई ः परंपरेनुसार लग्नसराईपूर्वी वर्षभर पुरेल इतका मसाला घरी करून ठेवला जातो. त्यामुळे बाजारात मिरची खरेदीसाठी गृहीनींची गर्दी  होत आहे. मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत तिखट मिरचीला मोठी मागणी असते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या लाल मिरच्या आल्या असून त्यांचे भावही यंदा वाढले आहेत. त्यामुळे या मिरचीचा जोरदार ठसका गृहीणींनी लागत आहे. 

या वर्षी मिरचीचे भाव गगनाला भिडल्याने आर्थिक बजेट जुळवताना महिलांची दमछाक होत आहे. त्यात बाजारात उपलब्ध असलेल्या विविध मिरचीचे भाव किलोमागे 50 ते 100 रुपयांपर्यंत वाढल्याने गृहिणींना ठसका लागला आहे. चटकदार खाण्यासाठी मसाला वापरात येत असल्याने पावसाआधीची मिरची बाजारात दाखल होते. सध्या बाजारात मिरचीचे 10 पेक्षा अधिक प्रकार उपलब्ध आहेत, मात्र मसल्याची लाल मिरची आणि बेडकी मिरचीला महिलांची पसंती आहे. दरम्यान, तयार मसाला बाजारात उपलब्ध असला तरी घरात तयार केलेल्या मसाल्याची चव काही औरच असते. तिखट मिरचीचे भाव त्या त्या प्रकारांवरून ठरतात. संखेश्‍वरी मिरची 800 रुपये किलो, बेडगी मिरची 480 रुपये किलो, काश्मिरी मिरची 560 रुपये किलो, लवंगी मिरची 240 रुपये, घाटी मिरची 210 रुपये किलो अशा दराने विकली जात आहे. यासोबत मसाल्यासाठी लागणारी खसखस, बडिशेप, धणे, हळद, राई, मिरी, दालचिनी इत्यादी जिन्नसालासुद्धा मोठी मागणी आहे. मिरचीचे दर वाढले आहेत. कोरोना काळामध्ये म्हणजे मागच्यावर्षी लॉकडाऊनमुळे मसाल्याचा सीझन झालाच नाही, त्याकारणास्तव ह्यावर्षी मसाल्याचा सीझन लवकर चालू झाला. मिरचीचे भाव वधारले कारण त्याला मागणी पण तेवढीच आहे. मसाल्यासाठी जास्तीकरून तेजा मिरची घेतात कारण ती जास्त तिखट असते.