Breaking News
मुंबई : 12 वी बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला असून विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली आहे. राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. तसेच बारावी परीक्षेच्या 154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती मंडळाच्यावतीने देण्यात आली आहे. विज्ञान शाखेचा निकाल 96.09 टक्के, कला शाखेचा निकाल 84.05 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 90.42 टक्के लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 93. 73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 89.14 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा पाच टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला असून मुंबईचा निकाला 88.13 टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला आहे.
यंदाच्या परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागातील 14,16,371 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 12,92,468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व्यवसाय अभ्यासक्रमात 89.25 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेसाठी मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या चार माध्यमातून आणि इतर शाखांसाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती आणि कन्नड या सहा भाषेतून परीक्षा घेण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai